एपी, दीर अल-बलाह
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पश्चिम आशिया दौरा संपत असताना शुक्रवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझामध्ये किमान ८२ जणांचा मृत्यू झाला. गाझामध्ये रात्री आणि शुक्रवारी दीर अल-बलाह आणि खान युनिस शहराच्या बाहेरील भागातही हल्ले झाले.
ज्या इंडोनेशियन रुग्णालयात बहुतेक मृतदेह नेण्यात आले होते त्या रुग्णालयाच्या माहितीनुसार, किमान ६६ लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी आणखी १६ मृतदेह नासिर रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती दिली. ट्रम्प यांचा आखाती देशांचा दौरा संपल्यापासून या प्रदेशात व्यापक हल्ले झाले आहेत.
या भेटीमुळे युद्धबंदी करार होऊ शकेल किंवा गाझाला मानवतावादी मदतीचे नूतनीकरण होऊ शकेल अशी व्यापक आशा होती. या प्रदेशावरील इस्रायली नाकेबंदी आता तिसऱ्या महिन्यात आहे.
दरम्यान, इस्रायलने ते गाझामधील दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरूच ठेवत असल्याचे स्पष्ट केले. तसेच गेल्या काही दिवसांत त्यांनी १५० लक्ष्यांवर हल्ला केला असल्याची माहितीही दिली. उत्तर गाझा येथील एका संकुलात अनेक दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावाही केला.
शुक्रवारी सकाळपर्यंत अनेक तास हल्ल्यांची मालिका सुरू असतानाच नागरिकांना जबलिया निर्वासित छावणी आणि बेत लाहिया शहरातून स्थलांतर करावे लागले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, हे हल्ले काही दिवसांपासून सुरू असलेल्या अशाच प्रकारच्या हल्ल्यांनंतर झाले आहेत, ज्यात १३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.