Iran VS Israel War: इस्त्रायल आणि इराणमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. इस्रायलने शुक्रवारी इराणवर हवाई हल्ले केले. त्यानंतर इराणनेही इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे या दोन्ही देशांत सध्या संघर्ष सुरू झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्रायलने इराणविरोधात ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ ही मोहीम सुरू करत हवाई हल्ले केले, तर इराणनेही इस्रायलमधील जेरुसलेम व तेल अवीवसह अनेक प्रमुख शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत.
तसेच इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर लढाऊ विमानांनी हल्ला केल्याची देखील माहिती समोर येत आहे. या बरोबरच इस्रायलने इराणमधील तेल डेपो, गॅस रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्पासह अनेक महत्वाच्या भागांना लक्ष्य केल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायलने पर्शियन आखातातील एका मोठ्या गॅस रिफायनरी क्षेत्रावर हल्ला केला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत अशांतता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या एका नैसर्गिक वायू प्रक्रिया प्रकल्पात मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागल्याची माहिती शनिवारी समोर आली. यामध्ये इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. या प्रकल्पावरील हल्ल्यामुळे पर्शियन गॅस परिसरातील काही प्रकल्पाचे प्लॅटफॉर्म बंद करावे लागल्याचं ब्लूमबर्गने दिलेल्या एका वृत्तात म्हटलं आहे.
इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या तेल डेपो, गॅस रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्पासह आदी भागांना लक्ष्य केल्यामुळे याचा फटका फक्त इराणपुरता मर्यादीत नाही, तर जगातील अनेक देशांना याचा फटका बसू शकतो. याचं कारण म्हणजे इराण हा कच्च्या तेलाचा प्रमुख पुरवठादार आहे. त्यामुळे इस्रायल आणि इराणच्या संघर्षाचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय बाजारावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, इस्रायलच्या ड्रोनने इराणच्या दक्षिणेकडील रिफायनरीवर अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला आहे. मात्र, अशा प्रकारच्या भागांना इस्रायलने लक्ष्य केलं तर आणखी या दोन्ही देशांत आणखी मोठ्या प्रमाणात तणाव वाढण्याची चिन्ह निर्माण होऊ शकतात. कारण इराणच्या दक्षिणेकडील प्रांतात मोठ्या प्रमाणात जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र असल्याचं सांगितलं जातं.