इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेच्या युद्धामुळे आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. इस्रायल सरकारला नमवण्यासाठी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलांचं अपहरण केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला हमासच्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी इस्रायली सैन्याने गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांना वेठीस धरलं आहे. इस्रायलच्या सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांना गाझा पट्टीतील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत जमिनीवरून आक्रमण करून रसद तोडल्यास रुग्णालयातील वीज, इंधन, वैद्यकीय साहित्य, मूलभूत गरजांचा पुरवठा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वीज आणि वैद्यकीय साहित्याअभावी रुग्णालयातील हजारो जखमी रुग्ण मृत्यूमुखी पडतील, असा इशारा गाझामधील रुग्णालयांतील डॉक्टरांनी इस्रायली सरकारला दिला आहेत. अशातच संयुक्त राष्ट्रांनीदेखील गाझामधील लोकांबाबत भीती व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्र मानवतावादी कार्यालयाने इस्रायल सरकारला इशारा दिला आहे की गाझामधल्या रुग्णालयांमधील इंधनाचा साठा पुढच्या २४ तासांत संपेल. परिणामी रुग्णालयांमधील रुग्णांचे जीव जातील. इस्रायली सरकारच्या कारवाईनंतर गाझामधील नागरिक अन्न, पाणी आणि सुरक्षित जागेसाठी संघर्ष करत आहेत. तसेच भूमध्य समुद्रात अमेरिकन युद्धनौकांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर गाझाच्या सीमेवर इस्रायली फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी इस्रायल आता जमिनीवरून हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

अल जझीराने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गाझा पट्टीतल्या खान युनीस भागातल्या नासीर रुग्णालयात अतिदक्षता विभागांमध्ये अनेक जखमी इस्रायली नागरिकांवर उपचार केले जात आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. क्रिटिकल केअर कॉम्प्लेक्समधील डॉ. मोहम्मद कंदील म्हणाले, बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेल्या शेकडो रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गाझा पट्टीत वीज नाही. इंधनावर सगळं काम सुरू आहे. परंतु, हे इंधन काही तासांमध्ये संपेल. उत्तर गाझा पट्टीतील कमाल अलवान रुग्णालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. हुमास अबू सफिया यांनी इस्रायलच्या आदेशानंतरही रुग्णालय रिकामं केलं नाही. कारण, रुग्णालयामधील रुग्णांना दुसरीकडे नेणं शक्य नाही. बाहेरची परिस्थिती बरी नाही.

हे ही वाचा >> “महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे-भेटवस्तू घेतल्या”, भाजपा खासदाराचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलने हल्ला केल्यापासून गाझा पट्टीत राहणारे नागरिक अन्न, पाणी आणि सुरक्षित जागा शोधण्यासाठी धडपडत आहेत. गेल्या आठवड्यात हमासच्या प्राणघातक हल्ल्यानंतर, इस्रायलने संपूर्ण गाझा परिसराला वेढा घातला आणि पॅलेस्टिनी नागरिकांना उत्तरेकडील भाग सोडून दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्र आणि येथील बचाव पथकांनी म्हटलं आहे, की ४० किलोमीटरच्या या किनारपट्टीला इस्रायलने वेढा घालून संपूर्ण नाकेबंदी केली असताना येथून अल्पावधीत नागरिक स्थलांतर करू लागले तर गंभीर संकट निर्माण होईल.