राफा, जेरुसलेम : इस्रायलचे लष्कर आणि रणगाडे यांनी बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे या कालावधीत उत्तर गाझामध्ये आक्रमण केले. याबद्दल माहिती देताना इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, युद्धाची तयारी करण्याच्या हेतूने यामध्ये हमासच्या अनेक ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.

रात्री केलेल्या या कारवाईमध्ये आमच्या सैनिकांनी हमासच्या अतिरेक्यांना ठार केले, त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या आणि त्यांची रणगाडाविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त केली असे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले. त्याशिवाय गेल्या २४ तासांमध्ये २५० हवाई हल्ले केल्याची माहिती त्यांनी दिली. बुधवारी रात्रीपासून केलेल्या जमिनीवरील आणि हवाई हल्ल्यांमध्ये किती पॅलेस्टिनी मारले गेले याची आकडेवारी अद्याप समजू शकले नाही.

गाझा पट्टीत मदत सामग्रीचे वितरण होईपर्यंत हवाई हल्ले तात्पुरते थांबवण्याच्या आवाहनाला इस्रायलने प्रतिसाद दिलेला नाही. आपण सामान्य नागरिकांना लक्ष्य करत नसून केवळ हमासला लक्ष्य करत आहोत, असा इस्रायलचा दावा आहे. 

हेही वाचा >>> राजस्थानच्या काँग्रेस नेत्यांवर ईडीचे छापे; पेपरफुटीप्रकरणी कारवाई

दुसरीकडे, पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मृतांचा आकडा सात हजारांपेक्षा जास्त झाला आहे. मृतांमध्ये २,७०० पेक्षा जास्त अल्पवयीन मुले आणि १,५०० पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. इस्रायल-पॅलेस्टाईनदरम्यान आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धापेक्षा ही प्राणहानी जास्त आहे. गाझामध्ये मंगळवारी ७०४ आणि बुधवारी ७५०पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील आरोग्य मंत्रालयाने दिली. इस्रायलने अधिक ताकदीने जमिनीवरील आक्रमणाला सुरुवात केली तर जीवितहानी वाढण्याची भीती आहे.

पुनर्वसनासाठी काही वर्षे लागतील – इस्रायल

जेरुसलेम : हमासने ७ ऑक्टोबरला हल्ला केलेल्या दक्षिण इस्रायलचे पुनर्वसन करण्यासाठी काही वर्षे लागतील, त्यामध्ये गाझा पट्टीवरील आक्रमणासह अन्य उपाययोजनाही हाती घेतल्या जातील, असा इशारा इस्रायलचे माजी लष्करप्रमुख बेनी गँट्झ यांनी गुरुवारी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वार्ताकनासाठी विक्रमी संख्येने विदेशी पत्रकार

तेल अविव : युद्धाचे वार्ताकन करण्यासाठी विक्रमी संख्येने विदेशी पत्रकार आले असल्याची माहिती इस्रायल सरकारच्या माध्यम कार्यालयाने दिली. सध्या इस्रायलमध्ये जवळपास १,८०० परदेशी पत्रकार असून ती २०१४च्या युद्धाच्या वेळी आलेल्या पत्रकारांच्या संख्येच्या दुप्पट आहे.