आपल्या एका बेपत्ता सैनिकाचा शोध घेण्यासाठी इस्रायलने शनिवारी गाझा पट्टीवर हल्ले चढवले. हा सैनिक हमासच्या ताब्यात असावा, या संशयाने हे हल्ले करण्यात आले. या नव्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टीतील हिंसाचारातील बळींची संख्या आता १६५० च्या पुढे गेली आहे.
इस्रायलने शुक्रवार-शनिवारच्या रात्री गाझा पट्टीवर आणि मुख्यत: राफा शहरावर केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ५० जण ठार झाल्याचा दावा गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी केला. एकूण बळींची संख्या १६५० वर गेली आहे. यातील बहुतांश बळी निरपराधांचे होते, असेही आरोग्याधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जखमी झालेल्यांची संख्यासुद्धा ८,९०० वर पोहोचली असल्याची माहिती देण्यात आली.
काल उभय पक्षांमधील ७२ तासांची शस्त्रसंधी संपल्यानंतर इस्रायलने हमासच्या ताब्यातील परिसरावर तोफांचा भडिमार केला. हमासने शस्त्रसंधीचा भंग करून इस्रायलच्या दोन सैनिकांची हत्या केली तर आणखी एकाला पकडले, असा आरोप इस्रायलने केला आहे. तर हमासने असे घडल्याचे मान्य करतानाच हा प्रकार युद्धबंदी सुरू होण्यापूर्वीच झाला होता, असे स्पष्ट केले.