जेरुसलेम : गाझाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या ‘ग्लोबल सुमुद फ्लोटिला’च्या ताफ्यातील ३९ जहाजे इस्रायली नौदलाने गुरुवारी अडवली. त्यानंतर इस्रायली सैनिक जहाजांवर चढले आणि त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. इस्रायलने गाढाला घातलेला वेढा तोडण्यासाठी ४० जहाजांमधून ५००पेक्षा जास्त कार्यकर्ते निघाले होते. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रेटा थनबर्ग, बार्सिलोनाच्या माजी महापौर अडा कोलाऊ, युरोपीय महासंघाच्या पार्लमेंटच्या सदस्य रिमा हसन आणि इतरांचा समावेश आहे.

ताफ्यातील एक जहाज इस्रायली सैनिकांच्या तावडीतून निसटले आणि गाझाच्या जवळ पोहोचले. पण तिथे त्याला अडवण्यात आले असून त्याच्याशी संपर्क तुटला आहे असे ‘ग्लोबल सुमुद फ्लोटिला’च्या संचालकांनी सांगितले. ही जहाजे बुधवारी गाझाच्या दिशेने निघाली होती. इस्रायली सैन्याने बुधवारी रात्रीच त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली होती. गुरुवारी सकाळपर्यंत ३९ जहाजांवरील कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला. त्यामुळे ती जहाजे इस्रायलच्या सैन्याने ताब्यात घेतल्याचे मानले जात आहे अशी माहिती संचालकांनी दिली.

‘ग्लोबल सुमुद फ्लोटिला’ने यापूर्वीही इस्रायली सैन्याला चकवा देऊन गाझाकडे जाण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, प्रत्येक वेळेला त्यांना अडवण्यात आले आहे. बुधवारी निघालेल्या ताफ्यातील जहाजांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक होती. युरोपमधील रोम, नेपल्स, इस्तंबुल, अथेन्स, ब्यूनस आयर्स या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात या निदर्शकांना पाठिंबा देण्यात आला. इटलीमध्ये याच मुद्द्यावर शुक्रवारी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

गाझावर पुन्हा हल्ले, ४१ ठार

देर अल् बलाह : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केलेल्या २० कलमी गाझा शांतता करारावर हमासने अद्याप उत्तर दिलेले नसताना, इस्रायलने गुरुवारीही गाझावरील हल्ले सुरू ठेवले. त्यामध्ये किमान ४१ पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती स्थानिक रुग्णालयांनी दिली.