Israel-Iran conflict : इस्रायल आणि इराण यांच्यादरम्यान शुक्रवारी सुरू झालेला संघर्ष रविवारी, तिसर्या दिवशी अधिक तीव्र झाला. दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. यादरम्यान इराणमधील एका वरिष्ठ लष्करी अधिकार्याने अणुहल्ल्यासंबंधी मोठा दावा केला आहे.
इस्रायलने जर इराणवर अणुबॉम्ब टाकला तर पाकिस्तान देखील इस्त्रायलवर अणुहल्ला करेल असा खळबळजनक दावा या इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केला आहे. इराणचे जनरल मोहसेन रेझाय यांनी इराणमधील एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधीचे विधान केले आहे. मात्र पाकिस्तानने हा दावा फेटाळून लावला आहे.
इराण-इस्त्रायल या दोन देशांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सुमारे २४८ मृत्यू (इराण २३० आणि इस्रायल १८) झाले आहेत. यादरम्यान दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला आहे. यादरम्यान इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि इराणच्या नॅशनल सेक्युरिटी कॉन्सिलचे सदस्य राझेय यांनी हा दावा केला आहे. “पाकिस्तानने आम्हाला आश्वासन दिले आहे की, जर इस्त्रायलने इराणवर अणुहल्ला केला तर ते इस्त्रायलवर अणुबॉम्ब टाकतील,” असे ते म्हणाले आहेत
मात्र पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे, इस्लामाबादने असे कोणतेही वचन दिले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नंतर एका एक्स पोस्टमध्ये असिफ यांनी सध्याच्या स्फोटक परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर इस्त्रायलने घोषित न केलेल्या अण्वस्त्रांबद्दल इशारा दिला आहे. तसेच या प्रदेशात संघर्ष वाढण्याची भीती लक्षात घेऊन पाकिस्तान अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकतो असेही ते म्हणाले आहेत. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
दरम्यान इस्लामाबादने अणुहल्ला करण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी पाकिस्तानने इस्त्रायलविरोधातील युद्धात इराणाला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. तेहरानवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने इराणच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आश्वासन दिले होते, तसेच ज्यू देश असलेल्या इस्रायलविरुद्ध मुस्लिम ऐक्याचे आवाहन देखील केले होते.
१४ जून रोजी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये बोलताना मुस्लिम राष्ट्रांनी इस्त्रायलविरोधात एकत्र आले पाहिजे अन्यथा आपली परिस्थिती देखील इराण आणि पॅलेस्टाईनसारखी होण्याचा धोका असल्याचे म्हटले होते.
“इस्त्रायलने इराण, येमेन, पॅलेस्टाईनला लक्ष्य केले. जर मुस्लिम राष्ट्र आत्ता एकत्र आले नाहीत तर प्रत्येकाची स्थिती अशीच होईल,” असे वक्तव्य आसिफ यांनी केल्याचे टर्की टुडेने म्हटले आहे.
आसिफ यांनी इस्रायलशी राजनैतिक संबंध असलेल्या मुस्लिम राष्ट्रांना संबंध तोडण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच त्यांनी ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन (ओआयसी)ची बैठक बोलावून इस्त्रायलविरोधात संयुक्त रणनीती तयार करण्याचे आवाहन देखील केले आहे.