Donald Trump On Israel Iran Conflict Updates : इस्त्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी वाढला आहे. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु आहेत. इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट केलं आहे. दुसरीकडे इराणनेही इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायलने इराणचे तेल डेपो लक्ष्य करत मोठे हवाई हल्ले केल्यामुळे संघर्ष वाढला. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडरचा देखील खात्मा झाला. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे.
या दोन्ही देशातील तणाव वाढलेला असताना अमेरिकेकडून या संघर्षाला इराणलाच जबाबदार ठरवण्यात येत आहे. यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याबाबत सर्वात मोठं विधान केलं आहे. ‘आम्हाला माहिती आहे की खामेनी कुठे लपले आहेत. बिनशर्त आत्मसमर्पण करावं’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी राणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचं स्पष्ट नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा त्यांच्याकडेच आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय इशारा दिला?
इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावर एक पोस्ट करत इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याबाबत आतापर्यंतचं सर्वात मोठं विधान केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “आम्हाला माहित आहे की तथाकथित सर्वोच्च नेते (इराणचे सर्वोच्च नेते) कुठे लपले हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. ते सोपे टार्गेट आहेत, पण ते तिथे सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना बाहेर काढणार नाहीत (मारणार नाही!)किमान सध्या तरी नाही.पण आम्हाला नागरिकांवर किंवा सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. पण आमचा संयम सुटत चालला आहे”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
इस्त्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “आता आमचं इराणवरील आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे. इराणकडे चांगले स्काय ट्रॅकर्स आणि इतर संरक्षणात्मक उपकरणे भरपूर होती. पण त्याची तुलना अमेरिकेने निर्माण केलेल्या गोष्टींशी होऊ शकत नाही. अमेरिकेपेक्षा हे कोणीही चांगलं करू शकत नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टनला परतले होते
जी-७ परिषदेसाठी गेलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अचानक वेळेआधीच वॉशिंग्टनला परतल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. इस्रायल-इराण संघर्षावर जी-७ परिषदेत चर्चा होणं अपेक्षित असताना डोनाल्ड ट्रम्प अचानक वॉशिंग्टनला का चालले असावेत? यावर तर्क-वितर्क चालू झाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना लक्ष्य करताना ट्रम्प यांनी आपण इराण-इस्रायल संघर्षातील मुद्द्यांवर काम करण्यासाठी वॉशिंग्टनला जात नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.
‘शस्त्रसंधीपेक्षा अधिक चांगला शेवट हवाय’ : ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षाबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारलं असता फक्त शस्त्रसंधी आपल्याला अपेक्षित नसल्याचं स्पष्ट केलं. “आम्हाला या संघर्षात फक्त शस्त्रसंधीपेक्षा अधिक चांगला शेवट हवा आहे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अधिक चांगला शेवट म्हणजे काय? अशी विचारणा केली असता “याचा अर्थ संघर्षावर पूर्णविराम. एक खराखुरा शेवट. फक्त तात्पुरती शस्त्रसंधी नको. संपूर्ण शेवट”, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.