Israel strikes Yemen : इस्रायलने येमेनची राजधानी सना शहरावर रविवारी भीषण हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याच्या माध्यमातून हुथी बंडखोरांना इस्रायलने लक्ष्य केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती भवनाच्या जवळील परिसरावर आणि इंधन साठा व वीज प्रकल्पावर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर सना शहरात अनेक मोठे स्फोट झाले आहेत.

रविवारी दुपारी येमेनची राजधानी सना या ठिकाणी इस्रायली हवाई हल्ल्यानंतर मोठमोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. हुथी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच इस्रायलने या हल्ल्यांना दुजोरा देताना म्हटलं की, “आम्ही सना शहरावर हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये राष्ट्रपती भवन आणि क्षेपणास्त्र तळांजवळील भागाला लक्ष्य केलं आहे.”

दरम्यान, हुथी सुरक्षेच्या सूत्रांनी एएफपीला सांगितलं की, सना येथील एका नगरपालिका इमारतीवर हवाई हल्ला झाला आणि त्यात काही जणांचे बळी गेल्याचं वृत्त आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. तसेच एका इस्रायली वृत्तसंस्थेने सांगितलं की, बंदर शहर होदेइदाह येथेही हल्ले झाल्याची नोंद आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

इस्रायली सैन्याने एक्सवर दिलेल्या एका निवेदनात म्हटलं की, “हुथी दहशतवादी राजवटीने इस्रायली राज्य आणि त्यांच्या नागरिकांवर वारंवार केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. ज्यामध्ये जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आणि यूएव्ही समाविष्ट आहे.”

दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी गाझा येथे इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून हुथींनी वारंवार इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले होते. यापैकी बहुतेक हल्ले रोखण्यात आले. मात्र, आता येमेनमधील हुथींना इस्रायलने हवाई हल्ले करत लक्ष्य केलं आहे. गेल्या दोन वर्षांत हुथींच्या हल्ल्यांमुळे लाल समुद्रात वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरवर्षी सुमारे १ ट्रिलियन डॉलर्स किमतीच्या वस्तूंचा प्रमुख मार्ग हा समुद्र आहे.

लाल समुद्रावर हुथी बंडखोरांचं नियंत्रण

२०१४ मध्ये भडकलेल्या यादवी युद्धात हुथी बंडखोरांनी राजधानी सनावर कब्जा मिळविला. आपल्या शेजारी देशात इराणचा वाढता प्रभाव सौदी अरेबियाला मान्य नव्हताच… त्यामुळे त्यांनी २०१५मध्ये युरोप-अमेरिकेच्या मदतीने येमेन सरकारकडे मदतीचा हात पुढे केला. या जोरावर येमेनी राज्यकर्त्यांनी हुथींना उत्तरेकडे ढकलले. एडन बंदरामध्ये आपला तळ हलवून आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले येमेन सरकार अस्तित्वात असले, तरी सनासह लाल समुद्राचा संपूर्ण किनारा हुथींच्या ताब्यात आहे.

इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला केल्यानंतर हमासच्या समर्थनार्थ लाल समुद्रातून जाणाऱ्या इस्रायल आणि अमेरिकेच्या जहाजांवर हुथी बंडखोरांनी अनेकदा हल्ले केले. इस्रालयच्या मदतीला जाणाऱ्या जहाजांवर एडनचे आखात, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि भूमध्य सागरातही हल्ले केल्याचा दावा हुथींकडून करण्यात येत आहे. या हल्ल्यांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जहाज कंपन्यांना दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून येणारा लांबचा सागरमार्ग घ्यावा लागत आहे. सुमारे १५ टक्के जागतिक व्यापार चालणारा हा मार्ग मोकळा करणे युरोप-अमेरिका-इस्रायलसाठी महत्त्वाचे बनले आहे.