Donald Trump : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले इस्रायल आणि हमासमधील युद्ध आता थांबले आहे. या युद्धबंदीच्या करारात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्काराचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र त्यांना हा सन्मान मिळू शकला नाही. असे असले तरी इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘इस्रायल पुरस्कार (Israel Prize)’साठी नामांकित केले आहे.
इस्रायलच्या संसदेत (Knesset) खासादरांना उद्देशून झालेल्या ट्रम्प यांच्या भाषणापूर्वी, नेतन्याहू म्हणाले की, ट्रम्प यांना ‘इस्रायल पारितोषिक’ (Israel Prize) मिळवणारे पहिले गैर-इस्त्रायली नागरिक बनवण्यासाठी त्यांनी त्यांचे नामांकन सादर केले आहे. पुढे ते म्हणाले की, “राहिला तो दुसऱ्या पुरस्कार, तर हा फक्त वेळेचा प्रश्न आहे, तुम्हाला तो मिळून जाईल!”
ट्रम्प हे इस्रायलचे ‘ग्रेट फ्रेंड’
नेतान्याहू यांनी संसदेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांची भरभरून स्तुती केली. नेतान्याहू यांनी ट्रम्प हे, “व्हाईट हाऊसमध्ये इस्रायलला लाभलेले आजपर्यंतचे सर्वात महान मित्र” असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “कोणत्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने इस्रायलसाठी यापेक्षा अधिक काही केलेले नाही.” पुढे बोलताना नेतान्याहू यांनी इस्त्रायलच्या सैनिकांचेही कौतुक केले, सैनिकांनी युद्धात हमासवर आश्चर्यचकित करणारे विजय मिळवले, असे ते म्हणाले.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या गाझा युद्धबंदी करारानंतर हमासकडून इस्रायली ओलिसांना परत सोपवण्यात येत आहे, तर इस्रायल जवळपास २००० पॅलेस्टिनियन कैद्यांना सोडण्याची तयारी करत आहे.
दोन वर्ष चाललेल्या युद्धात गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, युद्धविराम झाल्यानंतर आता येथे मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्याची तयारी होत आहे. हे युद्ध ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झाले होते. जेव्हा हमासच्या नेतृत्वाखालील गटाने इस्रायलवर हल्ला केला होता, ज्यामध्ये १२०० लोक ठार झाले होते तर २५० जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर इस्त्रायलने दिलेल्या प्रत्युत्तरात, गाझाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ६७६०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. युद्धबंदी करारनुसार हमासने २० इस्रायली ओलीसांना परत पाठवले आहे. तर इस्रायल २००० ताब्यात घेतलेल्यांना या ओलीसांच्या बदल्यात सोडणार आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपल्याचे जाहीर केले आहे.