Charlie Kirk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे आणि उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते चार्ली कर्क (वय ३१) यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यूटाह येथील एका महाविद्यालयातील आयोजित एका कार्यक्रमात चार्ली कर्क यांच्यावर गोळी झाडण्यात आली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. गोळीबारानंतरच्या गोंधळाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेची डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर दखल घेतली होती.

दरम्यान, उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते चार्ली कर्क यांच्या हत्या प्रकरणात इस्रायलचा संबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या संदर्भात सोशल मीडियावरही काही चर्चा सुरू झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, यावर आता इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी चार्ली कर्कच्या हत्येशी इस्रायलचा संबंध असलेल्या अफवांचा निषेध केला आहे. तसेच ‘हे एक भयानक मोठं खोटं आहे’ असं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.

बिन्यामिन नेतान्याहू काय म्हणाले?

“चार्ली कर्क यांच्या हत्येशी इस्रायलचा काहीतरी संबंध आहे अशी खोटी माहिती पसरवण्याचा कोणीतरी प्रयत्न केला आहे. पण हा वेडेपणा आहे, हे अपमानजनक आहे. चार्ली कर्क यांच्या हत्येशी इस्रायलचा काहीतरी संबंध नाही. चार्ली कर्क हे एक प्रतिभाशाली व्यक्ती होते. त्यांनी अमेरिकेचं रक्षण केलं, आपल्या सामान्य ज्यू-ख्रिश्चन संस्कृतीचं रक्षण केलं. चार्ली यांना इस्रायलवर प्रेम होतं, असं त्यांनी मला काही महिन्यांपूर्वी पाठवलेल्या पत्रात सांगितलं होतं”, असंही बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं.

चार्ली कर्क कोण होते?

रूढीवादी विचारांची थेटपणे मांडणी करणारे चार्ली कर्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी होते. सीएनएनच्या वृत्तानुसार, मागच्या वर्षी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत कर्क यांच्यामुळे ट्रम्प यांना तरूणांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. याबद्दल ट्रम्प यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले होते. कर्क यांच्या मृत्यूनंतर वृत्तवाहिनीवर बोलत असताना ट्रम्प यांनी चार्ली कर्क देशभक्त असल्याचं म्हटलं होतं.

स्वातंत्र्य, लोकशाही, न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आग्रहामुळे कर्क यांनी लाखो अमेरिकन तरूणांना प्रेरित केलं होतं. त्यांच्या कुटुंबियाप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. तसेच मारेकऱ्यांना शोधून त्यांना योग्य शिक्षा देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी खात्री देतो, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.