वृत्तसंस्था, राफा
गाझा पट्टीमध्ये रविवारी अन्नवाटप केंद्राकडे जाणाऱ्या लोकांवर इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यामध्ये किमान ३१ जण मारले गेले आणि इतर अनेक जण जखमी झाले, अशी माहिती आरोग्य अधिकारी आणि अनेक प्रत्यक्षदर्शींनी दिली. हे सर्व जण अन्न घेण्यासाठी मदत केंद्राकडे जात असताना इस्रायली सैन्याने साधारण एक किलोमीटर अंतरावरून त्यांच्यावर हल्ला केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हे अन्नवाटप इस्रायलच्या पाठिंब्याने चालणाऱ्या एका मदत गटाकडून केले जात होते. ‘‘आम्हाला अद्याप या घटनेतील जखमींबद्दल काही कल्पना नाही, आम्ही त्याची चौकशी करत आहोत,’’ असे इस्रायलच्या सैन्याने प्रसृत केलेल्या त्रोटक निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तर मदत गटाने सांगितले की, ‘‘आम्ही रविवारी सकाळी कोणत्याही हिंसाचाराविना अन्नवाटप केले आणि यापूर्वी कधीही आमच्या केंद्राच्या अवतीभोवती गोंधळ आणि हल्ला झालेला नाही.’’
दुसरीकडे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की या गोळीबारात एकूण ३१ जण मृत्युमुखी पडले आणि १७० जण जखमी झाले. घटनास्थळापासून जवळच ‘रेड क्रॉस’कडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाने किमान २१ जणांचा मृत्यू झाल्याचे आणि १७५ जण जखमी झाल्याचे सांगितले होते. मात्र, हल्ला कोणी केला हे त्यांनी सांगितले नाही.