इस्रोने गुरुवारी आयआरएनएसएस-१जी उपग्रहाचे पीएसएलव्ही सी३३ मार्फत अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी३३ यान अवकाशात सोडण्यात आले आणि त्याने आयआरएनएसएस-१जी हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला. गुरुवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी अवकाशयानाने अंतराळाकडे झेप घेतली. उड्डाणानंतर सुमारे २० मिनिटांत उपग्रह त्याच्या कक्षेत स्थिर करण्यात आला.
आयआरएनएसएस-१जी हा सात उपग्रहांच्या मालिकेतील शेवटचा उपग्रह आहे. मालिकेतील पहिला उपग्रह जुलै २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. सदर उपग्रहाच्या मोहिमेचा कालावधी १२ वर्षांचा आहे. आयआरएनएसएस यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित झाली आहे, सातवा उपग्रह सोडल्यामुळे ती अधिक कार्यक्षम होणार आहे, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मोदींकडून शास्त्रज्ञांचे कौतुक
भारताच्या आयआरएनएसएस-१जीचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. आपल्या सर्वासाठी ही अभिमानास्पद बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मालिकेतील या नव्या उपग्रहाचा देशवासियांना विशेषतः मच्छीमारांना फायदा होईल, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Story img Loader