“पंतप्रधान मोंदींना मारलेल्या मिठीने मला अनेक गोष्टी शिकवल्या,” असं मत ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी व्यक्त केलं आहे. चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबरोबरच याच वर्षी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ची (इस्रोची) पहिली सौर मोहिमही लॉन्च करण्याचा मानस असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी दिली. गुरुवारी यासंदर्भात बोलतानाच सिवन हे चांद्रयान-२ मोहिमेसंदर्भातील आठवणींमध्ये रमले. यावेळी बोलतान त्यांनी चांद्रयान-२ मधील विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्यानंतर भावूक होऊन पंतप्रधान मोदींना मारलेल्या मिठीसंदर्भातही भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सात सप्टेंबर रोजी चांद्रयान-२ मोहिमेमधील विक्रम लॅण्डरला चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवण्यात इस्रोला अपयश आले. चंद्राच्या पृष्ठभागापासून काही किलोमीटरवर असतानाच लॅण्डरचा चांद्रयान-२मधील ऑर्बिटरशी संपर्क तुटला. ‘विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटला आहे,’ अशी घोषणा त्यानंतर सिवन यांनीच केली होती. चांद्रयान २ मोहीम यशस्वी न झाल्याने सिवन यांना भावना अनावर झाल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांनी मिठी मारत धीर दिला. हा प्रसंग सर्व देशवासियांनी पाहिला. मोदींनी सिवन यांना मिठी मारुन धीर देतानाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरही चांगलाच व्हायरल झाला होता. याच मिठीबद्दल सिवन यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. “मी भावूक झालो होतो तेव्हा माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला मिठी मारली. त्यावेळी माझ्या मनात काय सुरु होतं हे त्यांना समजलं होतं. नेतृत्व कसे असते हे त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिलं. पंतप्रधानांनी मारलेल्या त्या मिठीने मला अनेक गोष्टी शिकवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मला धीर दिला ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला,” असं सिवन यांनी या मिठीबद्दल बोलताना सांगितलं.

चांद्रयान-२ मोहिमेमध्ये विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्यानंतर निराश झालेल्या वैज्ञानिकांचा धीर वाढवण्याचे काम पंतप्रधानांनी केल्याचेही सिवन यांनी सांगितलं. “आम्ही आणखीन प्रयत्न केले पाहिजेत असे प्रोत्साहन आम्हाला मोदींमुळे मिळाले. अवकाश संसोधनामध्ये नवीन गोष्टी साध्य करण्यासाठी आम्ही आता अधिक जोमाने काम करत आहोत,” असंही सिवन यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isros k sivan explains what he learnt from pm modis hug after failed moon mission scsg
First published on: 03-01-2020 at 10:11 IST