कर्नाटकमधील खाणसम्राट आणि माजी मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिच्या शाही विवासोहळ्यात विविध सेवा पुरविणाऱ्या पुरवठादारांवर आयकर विभागाकडून चौकशीचे गंडांतर आले आहे. या शाही लग्नसोहळ्यात तब्बल ५०० कोटी रूपये खर्च झाल्याची चर्चा देशभरात रंगली होती. आयकर विभागाकडून सोमवारी या लग्नात सेवा पुरविणाऱ्या बंगळुरू आणि हैदराबादमधील तब्बल १० इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी करण्यात आली. रेड्डी यांच्या कन्येच्या लग्नसोहळा भव्यदिव्य बनविण्यात या कंपन्यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, लग्नात झालेल्या उधळपट्टीबदल रेड्डी यांना जाब विचारण्याऐवजी या कंपन्यांचीच चौकशी सुरू झाल्याने चोर सोडून संन्याशाला फाशी अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.
या लग्नात झालेल्या उधळपट्टीची माहिती मिळाल्यानंतर आयकर विभागाकडून या कंपन्यांच्या अकाऊंटसची तपासणी, आर्थिक व्यवहारांच्या पावत्या आणि अन्य कंत्राटांबद्दल चौकशी सुरू झाली आहे. उच्चभ्रू वर्गाच्या मोठ्या विवाह सोहळ्यांमध्ये खास वातावरणनिर्मिती आणि ऐषोरामी सुविधा पुरविण्यासाठी या कंपन्या ओळखल्या जातात. यामध्ये कंपन्यांकडून स्विस बनावटीचे तंबू, महागडी चीनी मातीची भांडी , वैविध्यपूर्ण भोजन आणि आतीषबाजी अशा सुविधांचा समावेश आहे. आयकर विभागाकडून आता या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी झाल्यानंतर या कंपन्यांना नोटीस पाठविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याशिवाय, आयकर विभागाकडून जनार्दन रेड्डी यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयकर विभागाकडून लग्नात खर्चाची माहिती घेतली जात असून लवकरच याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता आहे.
या विवाह सोहळ्यापासून दूर राहण्याचा आदेश भाजपच्या नेत्यांना देण्यात आला होता, तर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी विवाह समारंभातील खर्चावर बारीक लक्ष ठेवून होते. खाणसम्राट रेड्डी हे भाजपचे माजी नेते असून २००८ ते २०११ या कालावधीत ते कर्नाटकचे मंत्री होते. खाण घोटाळ्याप्रकरणी रेड्डी यांनी तीन वर्षे तुरुंगवास भोगला असून सध्या ते जामिनावर सुटले आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ते टी. एम. मूर्ती यांनी या विवाहसोहळ्याबाबत प्राप्तिकर विभागाकडे तक्रार केली आहे.
रेड्डी यांची कन्या ब्राह्मणी हिने विवाह सोहळ्यासाठी तब्बल १७ कोटी रुपयांचा शालू परिधान केल्याची चर्चा होती. विवाहाचा सर्व खर्च धनादेशाच्या माध्यमातून करण्यात आला असून कालांतराने संबंधित बिले प्राप्तिकर विभागाला सदर करण्यात येणार असल्याचे रेड्डी कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. बंगळुरू आणि सिंगापूर येथील मालमत्ता गहाण ठेवून खर्च केला असल्याचा दावा रेड्डी यांनी केला आहे.
विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी एलसीडी स्क्रीन कार्ड तयार करण्यात आले होते. एका खोक्यात निमंत्रण पत्रिका ठेवण्यात आली होती. खोका उघडल्यानंतर रेड्डी कुटुंबीयांवरील गाणे सुरू होते आणि त्याद्वारे विवाहाचे निमंत्रण देण्यात आले. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. बंगळुरू पॅलेस मैदानावर हा सोहळा पार पडला आणि प्रवेशद्वारापासून पाहुण्यांसाठी ऐषारामी बैलगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती. भोजनाच्या कक्षाची बेल्लारी गावासारखी रचना करण्यात आली होती. बॉम्बशोधक आणि निकामी करणारे पथकही तैनात करण्यात आले होते. धार्मिक विधी पार पाडण्यासाठी तिरुपती-तिरुमला मंदिरातील पुरोहितांना निमंत्रित करण्यात आले होते.