Will India lift Ban on TikTok : नेपाळ सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे नेपाळची राजधानी काठमांडू सोमवारी (८ सप्टेंबर) निदर्शनांनी हादरली. सरकारच्या निर्णयाविरोधात जेन-झी तरुण रस्त्यावर उतरले होते. अनेक ठिकाणी या आंदोलनादरम्यान हिंसा देखील झाली. या निदर्शनांमध्ये किमान १९ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील ही अलिकडच्या काळातील सर्वात हिंसक निदर्शने होती असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ‘जेन-झीं’च्या या आंदोलनाला यश मिळालं आहे. यां आंदोलनानंतर नेपाळ सरकारने सोशल मीडिया अ‍ॅप्सवरील बंदी उठवली आहे. नेपाळचे दळणवळण, माहिती व प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी रात्री उशिरा या निर्णयाची घोषणा केली.

दुसऱ्या बाजूला, भारतात काही वर्षांपूर्वी टिकटॉक या सोशल मीडिया अ‍ॅपवर (शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म) बंदी घालण्यात आली होती. ही बंदी देखील हटवली जाणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. परंतु, या केवळ अफवा असल्याचं वक्तव्य केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. तसेच कोणीही टिकटॉकवरील बंदी उठवण्याबाबतची खोटी माहिती पसरवू नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

टिकटॉकबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री काय म्हणाले?

अश्विनी वैष्णव म्हणाले, “शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात आली असून यापुढेही ती कायम राहणार आहे. टिकटॉकवरील बंदी हटवण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही. ही बंदी उठवण्याबाबत सरकार स्तरावर साधी चर्चा देखील झालेली नाही कारण जी गरजेची नाही.” मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत वैष्णव यांनी टिकटॉकबाबतची भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली. टिकटॉकवरील बंदी हटवली जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

भारतात टिकटॉकची वेबसाइट सुरू?

अलीकडेच टिकटॉक वेबसाइट भारतात पहायला मिळाली होती. तेव्हापासून भारत टिकटॉकवरील बंदी उठवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सर्व अफवा असल्याचं सांगत टिकटॉकवरील बंदी हटवली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच भारतात पाहायला मिळालेल्या टिकटॉक वेबसाइट्सबाबत वैष्णव म्हणाले, “तो केवळ एक टेक्निकल ग्लिच (तांत्रिक समस्या) होता.”

पाच वर्षांपूर्वी घातलेली बंदी

केंद्र सरकारने जून २०२० मध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. ही बंदी अजूनही कायम आहे. या बंदीनंतर भारतात अ‍ॅपल व गुगल प्ले स्टोरवरून टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्स हटवण्यात आले.