इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी गुरुवारी जगभरातून आलेल्या नेत्यांचं स्वागत ‘नमस्ते’ करत केलं. विशेष बाब म्हणजे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांचं स्वागतही त्यांनी नमस्ते करतच केलं. मोदींनीही त्यांना नमस्कार केला. या दोघांच्या ‘नमस्ते’चा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. तसंच नेटकऱ्यांनी या दोन्ही नेत्यांचं, खास करुन जॉर्जिया मेलोनींचं स्वागत केलं आहे.

नेटकरी नेमकं काय काय म्हणत आहेत?

इटलीत भारताची संस्कृती दिसली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संस्कृती साता समुद्रापार पोहचवली आहे. असं कुमार नावाच्या एका युजरने म्हटलंय. देख रहा है ना बिनोद मोदीजी को नमस्ते किया. अशी एक कमेंट मुकुल नावाच्या युजरने केली आहे. जगभरात नमस्ते चर्चेत आलंय ते फक्त मोदींमुळेच असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ आणि फोटो अनेक नेटकरी व्हायरल करत आहेत.

हे पण वाचा- विश्लेषण :इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी युरोपात इतक्या प्रभावी कशा? भारताशीही संबंध सुधारणार?

गुरुवारी इटलीत पोहचले पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ परिषदेसाठी गुरुवारी रात्री इटलीला पोहचले. त्यांनी नुकतीच देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. इटलीत पोहचल्यानंतर त्यांनी जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. त्यावेळी हस्तांदोलन करण्याऐवजी मेलोनी यांनी नमस्ते करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच इतर नेत्यांनाही त्यांनी नमस्ते केलं. ज्याचं कौतुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होताना दिसतं आहे. हस्तांदोलन करणं ही पाश्चात्य पद्धत आहे. तर नमस्कार, नमस्ते अशा पद्धतीने स्वागत करणं ही भारतीय पद्धत आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी अशा भारतीय पद्धतीने स्वागत केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार?

जी ७ शिखर परिषदेत रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याबरोबरच इतर जागतिक विषयांवरील मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर या दौऱ्यावेळी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही असण्याची शक्यता आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांचा समावेश असेल. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक देशाच्या प्रमुखांबरोबर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इटलीच्या संसदेत काहीसा गोंधळ

एकीकडे इटलीत जी-७ परिषदेची लगबग चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला इटलीच्या संसदेत मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. इटलीच्या संसदेत काही खासदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार पहायला मिळाला. या घटनेचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. जी-७ शिखर परिषदेनिमित्त जगभरातील मोठ्या देशांचे प्रमुख इटलीत झाले आहेत. अशावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.