काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम त्यांची बाजू मांडण्यासाठी पुढे आले आहेत. कार्ती यांनी गुरूवारी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. आपण कधीही इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीला भेटलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. तब्बल ७२ तासांनी बुधवारी रात्री समोर आले. पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. त्यानंतर त्यांना सीबीआयने अटक केली होती. चिदंबरम यांच्या याचिकेवर गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पिठासमोर सुनावणी होणार असून, सीबीआय त्यांना हजर करणार आहे. चिदंबरम यांना अटक झाल्यानंतर काँग्रेसनेही भडकली आहे. काँग्रेसने या अटकेचा निषेध करीत सूडाच्या भावनेतून ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

चिदंबरम यांना अटक झाल्यानंतर त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी याप्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांवर खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलताना कार्ती चिदंबरम म्हणाले, इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांना मी आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही भेटलेलो नाही. मी एकदाच इंद्राणी मुखर्जीला बघितले आहे. ज्यावेळी सीबीआय मला तिच्यासमोर घेऊन गेली होती. मी तिच्याशी किवा तिच्या कंपनीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क केलेला नाही. पी. चिदंबरम यांना झालेली अटक ही फक्त माझ्या वडिलांवर झालेली कारवाई नसून काँग्रेसला लक्ष्य केले आहे. याचा निषेध करण्यासाठी मी जंतरमंतर मैदानावर जात आहे, असे त्यांनी सांगितले. ईडी आणि सीबीआयकडून चिदंबरम यांच्यावर झालेल्या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे. त्याचबरोबर याविरोधात निदर्शने करण्यासाठी जंतरमंतरवर सुरू केली आहे. काँग्रेसचे अनेक नेते मैदानावर एकत्र आले आहेत.