जम्मू-काश्मीर: फारुख अब्दुल्ला यांची अखेर नजरकैदेतून सुटका; आदेश जारी

गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

गेल्या सहा महिन्यांपासून नजरकैदेत असलेले जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. याबाबचा अधिकृत आदेश जम्मू-काश्मीर सरकारने जारी केला आहे. नुकतेच लोकसभेत अब्दुल्ला यांची नजरकैदेवरुन सुटका करण्याची मागणी करीत विरोधकांनी गोंधळ घातला होता.

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णंय केंद्र सरकारने घेतल्यानंतर जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) तत्काळ प्रभावाने माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्यासह, त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पिपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यंमत्री मेहबुबा मुफ्ती या तिघांना सरकारने त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले होते.

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी अब्दुल्ला यांच्या सुटकेची माहिती दिली. ते म्हणाले, सरकारने फारुख अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. अब्दुल्ला यांना १५ सप्टेंबर २०१९ पासून जनसुरक्षा कायद्यानुसार (पब्लिक सेफ्टी अॅक्ट) नजरकैदेत ठेवण्यात आले होते. कलम ३७० हटवून ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: J k government issues orders revoking detention of dr farooq abdullah aau