जाट आरक्षण संघर्ष समिती आणि सरकारमध्ये चर्चा झाल्यानंतर जाट आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय जाट आरक्षण संघर्ष समितीने रद्द केला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि जाट आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष यशपाल मलिक यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली. यामध्ये ते म्हणाले की जाट समाजाच्या पाच मागण्या सरकार नियोजित वेळेमध्ये पूर्ण करणार आहे. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जाट समाजाने आंदोलन मागे घेतले. केंद्रीय मंत्री विरेंद्र सिंह चौधरी आणि राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी केंद्राचे प्रतिनिधित्व केले.
जाट समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले. जाट समाजाला आरक्षण मिळण्याच्या प्रक्रियेत असलेल्या सर्व अडथळे दूर करू असे आश्वासन त्यांनी दिले. जाट आंदोलनासंबंधी उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर जाट आरक्षणाचे विधेयक लागू करण्याची मागणी जाट समाजातर्फे करण्यात आली. त्याबरोबरच आंदोलन कर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे, आंदोलनामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नोकरी देणे, ज्या अधिकाऱ्यांना आंदोलन कर्त्यांविरोधात पूर्वग्रह ठेऊन कारवाई केली त्यांना शिक्षा देणे या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.
२०१० ते २०१७ या काळात झालेल्या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांचे परीक्षण करुन त्यांच्यावरील गुन्हे माफ करण्यात यावे ही समाजाची प्रमुख मागणी होती. याआधी फतेहाबाद मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये उप- पोलीस अधीक्षक जखमी झाले आहे. हरियाणामधील फतेहाबाद येथे जाट आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी जाट नेत्यांना चर्चेसाठी बोलवले होते. फतेहाबादमधील धन गोपाल या गावामध्ये पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे चिडून आंदोलकांना पोलिसांवर दगडाचा वर्षाव केला. त्यामध्ये डीवायएसपी गुरूदयाल सिंग जखमी झाले. फतेहाबादमध्ये काही ठिकाणी पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे तसेच आंदोलकांना पसरवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराचा वापर केला. सोमवारी हरियाणामधून जाट समाजातील लोक मोठ्या संख्येने दिल्लीला जाणार होते. जंतर मंतर पासून लोकसभेमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरकारने समाजाच्या मागण्या मान्य केल्यामुळे उद्या दिल्लीतील मोर्चा रद्द करण्यात आला आहे.