भारतासह जगभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धा ओडिशाच्या पुरीतील जगन्नाथ मंदिराशी जोडल्या आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. जगन्नाथ पुरी यात्रा तर कोट्यवधी भाविकांसाठी अपार श्रद्धेचा विषय असतो. मात्र, करोना कालावधीनंतर मंदिर प्रशासनाला या मंदिरात एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. मंदिराच्या आवारापासून थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत उंदरांचा सुळसुळाट झाल्याची तक्रार मंदिर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांकडून व मंदिरातील पुजाऱ्यांकडून केली जात आहे. उंदरांचा हाच जाच कमी करण्यासाठी एका भाविकानं उंदीर पळवण्याचं यंत्र मंदिराला देणगी म्हणून दिलं होतं. पण देवाची झोपमोड होत असल्याचं कारण देत गाभाऱ्यात बसवलेलं हे यंत्र प्रशासनानं काढायला लावल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
नेमकं झालं काय?
हा सगळा प्रकार एका मशीनमुळे घडल्याचं समोर आलं आहे. ‘अर्थ इनोवेशन’ असं या मशीनचं नाव आहे. जगन्नाथ पुरी मंदिराच्या आवारात आणि गाभाऱ्यातही उंदीर झाल्याची तक्रार सातत्याने होत असल्यामुळे एका भाविकानं हे मशीन मंदिराला दान केलं. मंदिर प्रशासनानं हे मशीन थेट गाभाऱ्यात बसवलं. अनेकदा उंदीर देवाच्या मूर्तीजवळ, देवासाठी तयार करण्यात आलेल्या रत्नजडित सिंहासनावरही फिरत असल्याची तक्रार पुजारी आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यामुळे थेट गाभाऱ्यात मशीन बसवण्यात आलं खरं. पण काही दिवसांतच ते काढून टाकण्यात आलं. त्यासाठी प्रशासनानं दिलेलं कारणही तेवढंच चर्चेत आलं.
आवाजामुळे देवाची झोपमोड!
या मशीनमुळे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची झोपमोड होत असल्याचा दावा मंदिरातल्या पुजाऱ्यांनी केला आहे. या मशीनमधून एक विशिष्ट प्रकारचा आवाज होतो. या आवाजाची भीती उंदरांना वाटते आणि त्यामुळे उंदीर आसपासच्या परिसराकडे फिरकत नाहीत, या गृहीतकावर हे मशीन काम करतं. पण याच आवाजामुळे देवांची झोप मोडत असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या विरोधामुळे अखेर मंदिर प्रशासनाने हे मशीन काढून टाकलं आहे.
रामदेव बाबा आता पतंजलीमध्ये संन्यास शिकवणार! इच्छुकांना केलं आवाहन, अट फक्त एकच..१२वी पास!
मंदिरातील परंपरेचा दिला दाखला!
दरम्यान, आपल्या दाव्यासाठी मंदिराच्या परंपरेचा दाखलाही दिला जात आहे. आख्यायिकेनुसार, कित्येक वर्षांपासून भगवान जगन्नाथ रात्री झोपतात असं मानलं जातं. त्यानंतर विजयद्वार (मुख्य दरवाजा) ते थेट गाभाऱ्यापर्यंत पूर्णपणे निरव शांतता पाळली जाते. शिवाय पूर्ण अंधार केला जातो जेणेकरून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना शांतपणे झोप लागावी.
उंदरांना मारण्यास मनाई!
उंदरांच्या त्रासापासून बचाव करण्यात एक अडथळा म्हणजे मंदिरातील उंदरांना मारण्यास मनाई असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पुन्हा एकदा लाकडी पिंजरा ठेवण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गाभारा आणि परिसरातील उंदीर पकडून त्यांना बाहेर सोडण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला आहे. देवांना घातलेले कपडे आणि फुलांच्या माळाही उंदीर कुरतडत असल्याचं दिसून आलं आहे. तसेच, उंदरांमुळे परिसरात आणि गाभाऱ्यातही दुर्गंधी पसरल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे उंदरांच्या सुळसुळाटावर तातडीने उपाययोजना करणं आवश्यक असताना मशीन हटवल्यामुळे आता इतर उपायांवरच प्रशासनाचा भरंवसा असेल.
उंदीर मंदिराच्या मूळ रचनेलाच आतून पोकळ करण्याची भीती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मंदिराची फर्शी अनेक ठिकाणी अशाच प्रकारे पोकळ झाल्याचा दावा केला जात आहे. करोना काळापर्यंत एखादा उंदीर दिसायचा. पण करोना काळात मंदिर बंद ठेवल्यामुळे तिथे उंदरांनी घर केलं आणि आता त्यांचा सुळसुळाट वेगाने वाढत असल्याचीही भीती इथले कर्मचारी व्यक्त करताना दिसत आहेत.