Bihar Madhubani Jail: गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी त्यांना कारागृहात बंदिवासात पाठविण्यात येते. मात्र बिहारमधील मधुबनी येथील कारावासाला लग्न मंडपाचे स्वरुप प्राप्त झाले. एका विचित्र प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाला कारावासात एका आरोपीचे लग्न लावून द्यावे लागले. मोठ्या भावाच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे पीडितेबरोबर कारावासातच लग्न लावून देण्यात आले. तुरुंग प्रशासनाने या लग्नाची सर्व तयारी केली. पोलीस साक्षीदार तर इतर कैदी वऱ्हाडी बनले होते.

प्रकरण काय आहे?

लैंगिक अत्याचाराच्या आरोपात तुरुंगात असलेल्या आरोपीने पाटणा उच्च न्यायालयात पीडितेबरोबर लग्न करण्यासाठी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने आदेश दिले की, सदर आरोपी पीडितेबरोबर लग्न करतोय का? यावर सत्र न्यायालयाने देखरेख करावी. यानंतर आरोपीने कनिष्ठ न्यायालयात लग्नासाठीची परवानगी मागितली.

कारावास अधीक्षक ओम प्रकाश शांती भूषण यांनी बुधवारी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आरोपीचे तुरुंगाच्या आवारात लग्न लावण्यात आले. यासाठी सर्व तयारी तुरुंग प्रशासनाने केली होती.

आरोपीची बाजू मांडणारे वकील गगन देव यादव यांनी सांगितले की, आरोपीच्या मोठ्या भावाचे २०२२ मध्ये निधन झाले. त्यानंतर वहिनी आणि आरोपी हे एकमेकांच्या जवळ आले. मात्र कालांतराने त्यांच्यात कलह झाला. त्यामुळे पीडितेने २९ जून २०२४ रोजी तक्रार दाखल केली. यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. आरोपीने पीडित महिलेशी लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार, उच्च न्यायालयाचे न्यायाधीस सय्यद मोहम्मद फझलूल यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या देखरेखीखाली लग्न पार पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर कारावासात हा आगळावेगळा सोहळा पार पडला.