नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची रविवारी भर पावसात झालेली जाहीरसभा हा ‘निर्णायक क्षण’ असल्याचा दावा माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

सध्या काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कर्नाटकमध्ये असून म्हैसूरमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या जाहीरसभेत मुसळधार पाऊस सुरू असतानाही राहुल गांधी यांनी भाषण केले.  ‘कन्याकुमारीहून निघालेली ही यात्रा काश्मीपर्यंत जाणारच. या यात्रेला कोणीही रोखू शकत नाही, अगदी पाऊससुद्धा नाही. बघा इथे पाऊस पडतो आहे, पण, आपल्या यात्रेत खंड पडलेला नाही’, असे राहुल गांधी म्हणाले.

आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी देखील ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. त्यासाठी त्या सोमवारी म्हैसूरला पोहोचल्या. सोनियांचा सहभाग आणि कदाचित त्यांची होणारी जाहीर सभा ‘भारत जोडो’ यात्रेला भाजपशासित कर्नाटक राज्यामध्ये अधिक यशस्वी करू शकेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. ४ व ५ ऑक्टोबर हे विश्रांतीचे असून या दोन दिवसांमध्ये यात्रेच्या आगामी टप्प्याची आखणी केली जाईल. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सोनिया व राहुल पहिल्यांदाच एकत्रितपणे सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत ‘भारत जोडो’ यात्रेने तमिळनाडूमध्ये ६२ किमी, केरळमध्ये ३५५ किमी व तीन दिवसांत कर्नाटकमध्ये ६६ किमीचा पल्ला गाठला आहे. अजून १८ दिवस ही यात्रा कर्नाटकमध्ये असेल. नंतर ती आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तेथून महाराष्ट्रात प्रवेश करेल.

पोस्टल मतदान?

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदासाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यात्रेत सहभागी झालेल्या मतदारांना त्यादिवशी बेंगळुरूला प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात मतदान करतील.  कदाचित या यात्रेकरूंना पोस्टाद्वारे मतदान करण्याचा पर्यायही पक्षाकडून उपलब्ध करून दिला जाण्याची शक्यता आहे.

यात्रेसाठी अ‍ॅप

यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रेचा अ‍ॅप विकसित केला असून यात्रा कोणत्या रहिवासी भागांत असल्याची माहिती अ‍ॅपवर मिळू शकेल. यात्रेत सहभागी होऊन एक-दोन किमी अंतर चालताही येईल. यात्रेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्रकही काँग्रेसकडून दिले जाईल. या अ‍ॅपवर लोकांना प्रश्न विचारता येतील, सूचना करता येतील, अगदी टीकाही करता येईल, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली.