काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात धोरण लकव्याला जयराम रमेश जबाबदार होते असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केला. अलीकडे जयराम रमेश आणि शशी थरुर या दोन काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल ठरणारी वक्तव्ये केली आहेत. त्याबद्दल मोईली यांनी दोघांवर टीका केली. दोन्ही नेत्यांची वक्तव्ये दुर्देवी असून काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे असे मोईली म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत खलनायकाच्या भूमिकेत ठेऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर टिका करत त्यांच्या चांगल्या काम न स्वीकारल्याचा काहीच उपयोग होणार नाही असं मत जयराम रमेश यांनी व्यक्त केलं होतं. मोदींनी २०१४ ते २०१९ मध्ये जे काम केले त्याचे महत्व समजून घ्यायला हवे. याच कामाच्या जोरावर ते पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यांचे हेच काम पाहून ३० टक्क्यांहून अधिक मतदरांनी त्यांना पुन्हा सत्तेत बसवलं असल्याचे रामेश यांनी सांगितले.
जयराम रमेश यांचे विधान चुकीचे असून अशी विधाने करुन ते भाजपा बरोबर तडजोड करत आहेत असा आरोप मोईली यांनी केला. जे कोणी नेते अशी विधाने करत आहेत ते काँग्रेससाठी काम करत नाहीत. मंत्री म्हणून ते सत्ता उपभोगतात आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांना अनुकूल ठरणारी भूमिका घेतात असे मोईली म्हणाले. संपुआ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात धोरण लकवल्या रमेश जबाबदार आहेत असा आरोप मोईलींनी केला. शशी थरुर राजकारणी म्हणून परिपक्व नाहीत. वेगवेगळी विधाने करुन ते प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहतात. त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे मोईली म्हणाले.
काय म्हणाले होते शशी थरुर
खासदार शशी थरूर यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, मी मागील सहा वर्षांपासून सांगतो आहे की, आपल्याला पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कामांची प्रशंसा केली पाहिजे. यामुळे ते जेव्हा चुका करतात तेव्हा आपण केलेल्या टीकांची विश्वासर्हता कायम राहते, असे म्हटले होते.