पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर देत ६ आणि ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवलं. या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. दरम्यान या हल्ल्यांमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाला ठार कऱण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याबाबत जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मिरीने माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचं त्याने एका व्हिडीओत सांगितलं आहे.

६ मे च्या रात्री भारताने राबवलं ऑपरेशन सिंदूर

भारताने पाकव्याप्त जम्मू काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर ६ मेच्या मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला. भारताच्या या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा करण्यात आला. जे आता जैश ए मोहम्मदच्या टॉप कमांडरनेही मान्य केलं आहे.

कमांडरची कबुली नेमकी काय?

जैश ए मोहम्मदच्या कमांडरने कबुली दिली आहे की ७ मे रोजी भारताने बहावलपूरच्या दहशतवादी तळांवर जो हल्ला केला त्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले. कमांडर मसूद इलियासने ही कबुली दिली आहे. या हल्ल्यात मसूद अझरच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. त्याच्या कुटुंबातले अनेक सदस्य मारले गेले असंही त्याने म्हटलं आहे.

भारताने बहावलपूरमध्ये घुसून केला हल्ला

बहावलपूर हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. जैश ए मोहम्मदचं मुख्याल मरकझ सुभान अल्लाह या ठिकाणी आहे. पाकिस्तानवर भारताने १०० किमी आत घुसून हा हल्ला केला होता. ज्या हहल्ल्यात संपूर्ण तळ उद्ध्वस्त झाला होता. दहशतवादी मसूद अझहरचं कुटुंब या ठिकाणी राहात होतं. सॅटेलाईट फोटोंमधून भारताच्या हल्ल्यात मरकझ सुभान अल्लाह उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं होतं.

मसूद अझहरने रचला होता संसदेवरच्या हल्ल्याचा कट

मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्याचा हात होता.