Omar Abdullah : जम्मू-काश्मीरमध्ये शहीदांना श्रद्धांजली वाहण्याच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना शहीद स्मारकात जाण्यापासून रोखल्यामुळे ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. पण तरीही सोमवारी सकाळी ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीर येथील शहीद स्मारकात जाऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली. पण यावेळी मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे जेव्हा शहीद स्मारकात जात होते, तेव्हा पोलीस आणि निमलष्करी दलांनी त्यांना रोखलं. पण तरीही ओमर अब्दुल्ला हे शहीद स्मारकाला असलेल्या गेटवरून चढून आतमध्ये गेले आणि त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

‘कधी कधी पोलीस देखील कायदा विसरतात, पण आम्ही कोणाचेही गुलाम नाही, वाटेल तेव्हा आम्ही शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी येणार”, असा इशारा देखील ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी दिला.

ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?

श्रद्धांजली वाहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं की, “नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या निर्देशांवरून राजकीय नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले. रविवारी आम्हाला शहीदांच्या स्मारकात जाण्याची परवानगी नव्हती. सकाळपासून आम्हाला आमच्या घरात नजर कैदेत ठेवले होते. मी नियंत्रण कक्षाला कळवलं की मला तिथे जाऊन फातेहा वाचायचा आहे. पण काही मिनिटांतच माझ्या घराबाहेर एक बंकर उभारण्यात आला”, असा आरोप ओमर अब्दुल्ला केला आहे.

“आजही आम्हाला तिथे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा पोलिसांना विचारलं की, कोणत्या कायद्यानुसार आम्हाला तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं आहे? शहीदांचं स्मरण करणं गुन्हा आहे का? आम्ही कोणाचेही गुलाम नाही आहोत. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही येथे शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येऊ”, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं.