४८ तासानंतर चकमक समाप्त; तीन जवान शहीद, लष्कर- ए – तोयबाचा हात
काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पांपोर येथे लागोपाठ तिसऱ्या दिवशी दहशतवादी व सुरक्षा दले यांच्यात चकमक सुरू होती, त्यात आज दोन दहशतवादी ठार झाले. ही चकमक संपली असून एकूण तीन दहशतवादी ४८ तासांच्या धुमश्चक्रीत मारले गेले. लष्कराने कमांडो दलाचे तीन जवान यात गमावले, त्यात दोन कॅप्टनचा समावेश आहे. दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार होती असे समजते.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी सांगितले की, या चकमकीमागे लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचा हात आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दोन दहशतवादी मारले गेले आहेत. आग लागल्यानंतर दुपारी ईडीआय इमारतीतून विद्यार्थ्यांसह १०० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सोमवारी सकाळी साडेपाच वाजता दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार सुरू केला. रविवारी याच चकमकीत कॅप्टन पवनकुमार व कॅप्टन तुषार महाजन तसेच लान्स नायक ओम प्रकाश हे हुतात्मा झाले होते.
हरयाणात कॅप्टन पवनकुमार (वय २३) यांना लोकांनी जिंदमधील बधना खेडय़ात शोकाकुल वातावरणात निरोप दिला. जाट लोकांची निदर्शने सुरू असल्याने लष्कर व सरकारने संबंधित खेडय़ाकडे जाण्याचा मार्ग मोकळा करून देण्याचे आवाहन केले. पवनकुमारचे शिक्षक असलेले वडील राजबिर सिंग यांनी चितेला अग्नी दिला. मला एक मुलगा होता, तो मी देशासाठी दिला, कुठल्याच वडिलांना एवढा अभिमान नसेल एवढा मला पवनचा अभिमान वाटतो.
घाई नको -लष्कराच्या सूचना
दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी जवानांनी घाई करू नये तरच लष्कराची आणखी जीवितहानी टळेल, असे लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी सांगितले. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना अमुक एका मुदतीत बाहेर काढा असे म्हटलेले नाही, जवानांनी घाई करू नये, आपली प्राणहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूटच्या दोन इमारती मोकळ्या करण्यात आल्या आहेत.
आता तिसऱ्या इमारतीत दहशतवादी लपले आहेत, पण घाई करण्याचे कारण नाही. हा सगळा परिसर १५ एकरचा आहे तेथे १० हजार चौरसफुटांचे बांधकाम असून मोठय़ा ४०-५० खोल्या आहेत, लष्कराने तीन मोहरे गमावले आहेत. खोल्या तपासताना सावधानता बाळगली पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.