पीटीआय, श्रीनगर

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी श्रीनगरमध्ये काढलेल्या मोठय़ा ‘तिरंगा’ मिरवणुकीत भाग घेतला. ‘‘जम्मू-काश्मीरच्या तरुणांना राष्ट्रध्वज आवडतो,’’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वातंत्र्यदिन सोहळय़ाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या मिरवणुकीत सिन्हा यांनी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’च्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना अप्रत्यक्षरीत्या लक्ष्य करताना म्हंटले, की जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कोणीही उरणार नाही, असा दावा करणाऱ्यांनी या मिरवणुकीत झालेली गर्दी अवश्य पाहावी.

मेहबूबा म्हणाल्या होत्या, की जर जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला गेला, तर येथे राष्ट्रध्वज उभारण्यासाठी कोणीही शिल्लक राहणार नाही. हा संदर्भ घेत सिन्हा म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवायला कोणीही उरणार नाही, असे जे म्हणत होते, त्यांना आतापर्यंत हे उमगले असेल की, जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक तरुणाचे राष्ट्रध्वजावर देशाच्या इतर भागांतील नागरिकांइतकेच प्रेम आहे. आज देशभरात जम्मू-काश्मीरवासीयांची प्रशंसा होत आहे. आम्ही नागरिकांत एकजूट करून विकास घडवत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेव्हा नेहरूंना सुरक्षेची गरज भासली नव्हती : मेहबूबा मुफ्ती

‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’च्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना प्रत्युत्तर देताना म्हटले, की आज प्रशासनाला राष्ट्रध्वजाच्या रक्षणासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. मात्र, आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९४९ मध्ये जनतेत मिसळून राष्ट्रध्वज फडकावला होता. नेहरू तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन श्रीनगरच्या लाल चौकात उत्साही काश्मिरीवासीयांच्या अथांग गर्दीत अभिमानाने ताठ कण्याने उभे होते, मात्र, २०२३ मध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कडे असताना जम्मू-काश्मीर प्रशासन राष्ट्रध्वज घेऊन गेले.