राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांच्या घरावर छापासत्र सुरू केले आहे. टेरर फंडिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये एनआयएने मंगळवारी(दि.27) काश्मीर खोऱ्यात एकूण सात ठिकाणी छापे मारल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामध्ये फुटीरतावादी नेते यासीन मलिक, शब्बीर शाह, मीरवाइज उमर फारुख, अशरफ खान, मसरत आलम, जफ्फार अकबर आणि नसीम गिलानी यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.


ही कारवाई दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना अर्थसहाय्य करण्याच्या कारणावरून करण्यात आली आहे. यासंबंधीत अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या मदतीने छापेमारीची कारवाई केली.अनेक मालमत्तांची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या पावत्या, बँक खात्यांचे तपशील, विविध दहशतवादी संघटनांचे लेटरहेड आणि पाकिस्तानी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी व्हिसा देण्यासाठी शिफारस पत्र अशी अनेक प्रकारची कागदपत्रे या छाप्यांमध्ये एनआयएच्या हाती लागली आहेत. याव्यतिरिक्त फुटीरतावादी नेता मीरवाइज उमर फारुखच्या घरातून हायस्पीड इंटरनेट कम्युनिकेशन सेटअपदेखील जप्त करण्यात आल्याचीही माहिती आहे. दुसरीकडे, या छापेमारीचा निषेध म्हणून फुटीरतावाद्यांनी दोन दिवस काश्मीर बंदचे आवाहन केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir nia raids houses of separatists
First published on: 27-02-2019 at 09:25 IST