जम्मू काश्मीरमधील उरी येथील भारतीय सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत. सुमारे तीन तासांच्या चकमकीनंतर सैन्याच्या जवानांना या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

उरी येथे सैन्याच्या १२ व्या ब्रिगेडचे मुख्यालय असून  या मुख्यालयावर सकाळी दहशतवादी हल्ला झाला.चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. मुख्यालयाच्या आत प्रवेश केल्यावर दहशतवादी दोन – दोनच्या गटात वेगळे झाले आणि त्यांनी मुख्यालयावर अंधाधूंद गोळीबार केला.  उरीतील हे मुख्यालय सीमारेषेजवळ आहे. या घटनेनंतर परिसराला सुरक्षा दलाच्या पथकांनी वेढा घातला. अडीच ते तीन तास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या हल्ल्यात  १७ जवान शहीद झाले आहेत.  हल्ला करणा-या चारही दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सध्या सुरक्षा दलाचे पथक परिसराची कसून तपासणी करत आहेत.  या हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रशिया आणि अमेरिकेचा दौरा पुढे ढकलला आहे. उरीतील हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हेदेखील उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि सैन्याचे प्रमुख दलबिर सिंह हे जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहेत. 

दरम्यान, हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. तसेच गृहसचिव आणि गृहमंत्रालयातील अन्य वरिष्ठ अधिका-यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.