जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी हंदवाडा येथे तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही दहशतवादी हे लष्कर- ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असून ते पाकिस्तानचे असल्याची माहिती उघड झाली आहे.
हंदवाड्यातील मगम परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. तर सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. सुरक्षा दलाची चांगली कामगिरी अशा शब्दात त्यांनी जवानांचे कौतुक केले. मात्र चकमकीविषयी त्यांनी अधिक तपशील दिला नाही.
Three LeT terrorists all Pakistanis neutralised in Magam area of Handwara district in North Kashmir. Excellent work!
— Shesh Paul Vaid (@spvaid) November 21, 2017
गेल्या आठवड्यातही सुरक्षा दलांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झाकिर उर रहमान लख्वी याच्या पुतण्यासह लष्कर- ए- तोयबाच्या सहा दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले होते. यात हवाई दलाच्या गरुड कमांडो पथकातील एक जवान शहीद झाला होता. हाजिन येथे ही कारवाई करण्यात आली होती. यापाठोपाठ हंदवाड्यात कारवाई झाल्याने ‘लष्कर’ला हादरा बसला आहे.