scorecardresearch

Jammu Kashmir: लष्कराने तीन दिवसात घेतला बदला, अधिकाऱ्याच्या हत्येत सहभागी दहशतवाद्यांना केलं ठार, चकमक अद्यापही सुरु

जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने केलं ठार

Jammu Kashmir: लष्कराने तीन दिवसात घेतला बदला, अधिकाऱ्याच्या हत्येत सहभागी दहशतवाद्यांना केलं ठार, चकमक अद्यापही सुरु
लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना केलं ठार

जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन आणि एका स्थानिक दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. शोपियन जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये भारतीय लष्कराला हे यश मिळालं. द्राच परिसरात एक चकमक सुरु असून, मुलू येथेही भारतीय लष्कराकडून कारवाई सुरु आहे.

सुरक्षा जवानांनी द्राच परिसरात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर मुलू येथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. पोलिसांनी ट्वीट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. ठार करण्यात आलेले दोन दहशतवादी एसपीओ जावेद दार यांच्या हत्येत सहभागी होते.

एसपीओच्या हत्येचा बदला

ठार करण्यात आलेले दहशतवादी हनान बिन याकूब आणि जमशेद हे दोघे एसपीओ जावेद दार यांच्या हत्येत सहभागी होते. २ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी जावेद दार यांची हत्या केली होती. तसंच पुलवामा येथे २४ सप्टेंबरला झालेल्या एका कामगाराच्या हत्येतही या दहशतवाद्यांचा सहभाग होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

२ ऑक्टोबरला पुलवामा येथील पिंगलानामध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यामध्ये जावेद दार यांचा मृत्यू झाला होता.

मुलू येथील चकमक अद्याप सुरु असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

अमित शाह जम्मू काश्मीर दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीवर दौऱ्यावर असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून राजौरी जिल्ह्यात त्यांनी एका सभेला संबोधित केलं. अमित शाह यांनी दहशतवाद्यांशी लढताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली. बुधवारी ते बारामुल्ला येथे एका सभेला संबोधित करणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या