Jammu and Kashmir LG Manoj Sinha: जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या दूरच्या नात्यात लागणाऱ्या नातवाने कानपूर येथे राहत्या घरात आत्महत्या केली. १६ वर्षीय विद्यार्थी आरवने कानपूरमधील घरात आत्महत्या केली. ११ वीत शिकत असलेल्या आरवने खिशात एक नोट लिहून ठेवली होती. ज्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितले. आरवचे वडील हे कानपूरमधील व्यापारी असून ते नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे दूरचे नातेवाईक आहेत.

आरवने मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहिले की, त्याच्या आत्महत्येच्या कारणांची चौकशी केली जावी. यानंतर कुटुंबियांनी त्याचा मोबाइल तपासला असता त्यातील नोटपॅडमध्ये इंग्रजीत लिहिलेले सविस्तर पत्र आढळून आले. पोलीस आणि नातेवाईकांनी अद्याप यावर कोणतीही माहिती दिलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा मुलगा गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. त्याला स्वप्नात काही लोक वारंवार दिसत होते. ते त्याच्या कुटुंबाला इजा करण्यास त्याला उद्युक्त करत होते किंवा स्वतः आत्महत्या करावी, असे सांगत होते. आरवने आत्महत्या केली, तेव्हा त्याच्या घरातील सर्व लोक छठ पूजेसाठी भागलपूर येथे गेले होते. तर बहीण विद्यापीठात गेली होती.

बहीण घरी आल्यानंतर तिला दरवाजा बंद असलेला दिसला. यानंतर तिने याची माहिती शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी तपासले असता आरव गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

कानपूरच्या कोहना पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सांगितले की, आरवच्या मोबाइलमधील इंग्रजीत लिहिलेले पत्र मिळाले आहे. फॉरेन्सिक पथकाने मोबाइल ताब्यात घेतला असून त्याची तपासणी सुरू आहे. कुटुंबातील सदस्यांचीही विचारपूस सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरव राज्यस्तरीय जलतरणपटू होता. शाळेतर्फे तो इतर जिल्ह्यांमध्ये स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जात असे.

कोण आहेत मनोज सिन्हा?

मनोज सिन्हा हे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. ऑगस्ट २०२० पासून ते जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल पद सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी गाझीपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्याकडे रेल्वे आणि दळणवळण या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी होती.