जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या गोळीबारात मारला गेलेला दहशतवादी बुरहान वानी याने जम्मू-काश्मीरसाठी बलिदान दिले, त्यामुळे तो शहीद झाला आहे, असे वादग्रस्त विधान नॅशनल कॉन्फरसच्या आमदाराने आज, मंगळवारी केले. जम्मू-काश्मीर विधानसभेत चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. काश्मीरमध्ये वानी मारला गेल्यानंतर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे जवळपास चार महिने काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.
He (Burhan Wani) is a martyr as he gave his life for the cause of J&K. I said this in the J&K Assembly: Shauqat Hussain Gannai, NC pic.twitter.com/3NzrXQrn7m
— ANI (@ANI) January 3, 2017
जम्मू आणि काश्मीर विधानसभेत काश्मीरमधील परिस्थितीवर मंगळवारी चर्चा सुरू झाली. चर्चेदरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सने भाजप-पीडीपी आघाडी सरकारला घेरले. त्याचवेळी विरोधी पक्षाचे नेता आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरमध्ये २०१० मधील हिंसाचाराच्या घटनेचा उल्लेख करून आपण अपयशी ठरल्याची कबुली दिली. तसेच राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेमागील सत्य उघड करावे, अशी मागणी त्यांनी केली. पीडीपी विरोधी पक्षात असताना काश्मीरमध्ये झालेल्या मृत्यूंप्रकरणी सरकारवर टीका करण्याचे काम केले, अशी आठवणही अब्दुल्ला यांनी करून दिली.
सभागृहात अब्दुल्ला यांनी सरकारवर निशाणा साधला असतानाच त्यांच्या पक्षाचे नेते आणि आमदार शौकत हुसैन यांनी विधानसभेच्या बाहेर वादग्रस्त विधान केले आहे. बुरहान वानी शहीद आहे. कारण त्याने जम्मू-काश्मीरसाठी बलिदान दिले. मी ही गोष्ट विधानसभेतही बोललो आहे, असे त्यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले. दरम्यान, पाकिस्ताननेही दहशतवादी बुरहान वानी याला शहीद घोषित केले होते. तसेच काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराच्या घटनेवर केंद्र सरकारच्या भूमिकेवरही टीका केली होती.