अनंतनागमध्ये दहशतवाद्यांकडून ‘मानवी ढाल’चा वापर, चकमकीत एक महिला ठार

दहशतवाद्यांनी काही लोकांना ओलीस ठेवले आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. छायाचित्र: एएनआय

अनंतनाग येथील डलगाम परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. टीव्ही माध्यमात आलेल्या वृत्तानुसार या परिसरात ‘लष्कर ए तोएबा’चे दोन दहशतवादी लपल्याचे सांगण्यात येते. परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला असून शोध मोहीम राबवण्यात येत असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. दोन दहशतवादी एका घरात लपले असून त्यांनी घरातील लोकांना ओलीस ठेवले आहे. तर याचदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ताहिरा (वय ४४) असे मृत महिलेचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. चकमकी दरम्यान या महिलेला गोळी लागली होती. तिला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ब्रेंती बटपोरा येथे लष्कर ए तोएबाच्या एक कमांडरसह दहशतवादी असल्याचे समजताच सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी सामान्य नागरिकांचा उपयोग ‘मानवी ढाल’ करण्यासाठी करत आहेत. लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jammu kashmir search operations by security forces in daligam in anantnag district two militants hiding