जम्मू- काश्मीरमधील शोपियाँ येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटे परिसरात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. यादरम्यान झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.  शोपियाँतील अमशीपोरा येथे ही चकमक झाली असून चकमकीत खात्मा झालेला दहशतवादी हा आयसिसचा जम्मू- काश्मीरमधील टॉप कमांडर होता. इश्फाक अहमद सोफी उर्फ अब्दुल्ला भाई असे या दहशतवाद्याचे नाव आहे. इश्फाक हा आयसिसचा जम्मू- काश्मीरमधील एकमेव कमांडर होता. त्याचा खात्मा झाल्याने इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू- काश्मीर या दहशतवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे. इश्फाक सोफी हा २०१५ मध्ये हरकुतूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. यानंतर २०१६ मध्ये तो इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू- काश्मीर या संघटनेत सामील झाला होता. तो आयएसजेके टॉप कमांडर होता.

यापूर्वी ३ मे रोजी देखील शोपियाँ जिल्ह्यात चकमक झाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.  त्यात हिज्बुल मुजाहिद्दीनचा पूर्वी मारला गेलेला म्होरक्या बुरहाण वाणी याचा साथीदार लतीफ दर उर्फ लतीफ टायगर याचा समावेश होता.लतीफ २०१४ मध्ये दहशतवाद्यांना सामील झाला. त्यानंतर त्याला अटक झाली होती. नंतर तो जामीनावर सुटल्यावर न्यायालयात हजर झाला नव्हता. दक्षिण काश्मीरमध्ये सरपंचांच्या हत्यांपासून ते अनेक दहशतवादी कारवायांत तो सामील होता. रियाझ नायकू आणि झाकिर मुसा यांच्यासमवेत तो घातपाती कारवाया करत होता.