करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवीच्या यात्रेला आजपासून स्थगिती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जम्मू काश्मीरमधून येणाऱ्या तसंच त्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व बस देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी मंगळवारी वैष्णोदेवी धाम येथे असलेली गुंफा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर दुसरीकडे श्रीनगर एनआयटीनंतर मंगळवारी जम्मूतील आयआयटी आणि आयआयम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे. मुबारक मंडी डोगरा आर्ट-म्युझियम आणि श्रीनगर एसपीएस म्युझियम ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आलं आहे.

सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी हॉटेल्सदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अनंतनाग, बारामुल्लासारख्या ठिकाणी हॉटेल्स, जिम, शाळा, पार्क पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी सर्व शिक्षण संस्था, शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कारगिलमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं असून बार असोसिएशननंही २५ मार्चपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.