Japan Prime Minister Shigeru Ishiba Resign : सलग दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे टीका होत असताना, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष नेतृत्वासाठी संघर्ष सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की त्यांनी एलडीपी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश राजकीय अनिश्चिततेच्या काळात जाऊन पोहचला आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर शिगेरू इशिबा यांनी सातत्याने निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. जपानमध्ये त्यांचे शरकार अल्पमताता आहे, ज्यामुळे धोरणे लागू करणे जास्तच अवघड झाले आहे. जुलैमध्ये सभागृह निवडणुकीत एलडीपी आणि त्यांचे सहकारी कोमेइतो यांना फक्त ४७ जागा मिळाल्या होत्या. त्याआधी त्यांच्याकडे ७५ जागा होत्या. मात्र २४८ सदस्यांच्या सभागृहात साधारण बहुमत मिळवण्यासाठी त्यांना किमान १२५ जागा हव्या होत्या. म्हणजेच बहुमत मिळवण्यासाठी त्यांना आणखी ५० जागांची आवश्यकता होती.
निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या पक्षातील अनेक नेते त्यांच्यावर नाराज होते आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. त्यांची इच्छा होती की इशिबा यांनी जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घ्यावी. एनएचकेच्या रिपोर्टनुसार, शनिवारी जपानचे कृषिमंत्री आणि एक माजी पंतप्रधान यांनी इशिबा यांची भेट घेतली आणि त्यांना राजीमाना देण्यासाठी तयार केले.
कोण आहेत शिगेरू इशिबा?
शिगेरू इशिबा जपानचे १०२ वे पंतप्रधान आहेत, तोत्तोरी येथे एक राजकारणात सक्रिय असलेल्या पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कीओ विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी टोकियो येथे गेले. त्यांनी मित्सुई बँकेतही काम केले, मात्र १९८३ मध्ये राजकारणात सक्रिय झाले आणि १९८६ मधअये तोत्तोरी प्रांताच्या प्रतिनिधी सभेसाठी निवडले जाणारे ते सर्वात कमी वयाच्या सदस्यापैकी एक बनले.
माजी संरक्षणमंत्री राहिलेल्या इशिबा यांनी इतरही अनेक पदांवर काम केले आहे. यामध्ये जपानच्या घसरत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूती मिळवून देण्यासाठीच्या परिषदेचे प्रभारी मंत्री आणि कृषि, वानिज्य आणि मत्स्य पालन या विभागाचे वरिष्ठ राज्य सचिव या पदांचा देखील समावेश आहे. १९९३ मध्ये इशिबा एल.डी.पीमधून वेगळे झाले आणि जपान रिन्यूअल पार्टीमध्ये दाखल झाले, पण तीन वर्षांनंतर १९९६ मधअये ते एल. डी. पी. मध्ये परत आले.