पाकिस्तानी सैनिकांनी कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय हद्दीत प्रवेश केला होता, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचे भारताने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांवर आणि घटनास्थळी  सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांवरून हल्लेखोर पुन्हा सीमारेषेपलीकडे पळून गेल्याचे सिद्ध होते.

कालच भारताच्या डीजीएमओंनी (लष्करी कारवाईचे प्रमुख) पाकिस्तानच्या या कृत्याला सडतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण करून भारताने पाकला समन्सही बजावले. बासित यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या घृणास्पद कृत्याविषयी निषेध व्यक्त केला होता. मात्र, या बैठकीत बासित यांनी सीमेवरील हल्ल्यात पाकचा सहभाग नसल्याचा दावा केला होता. परंतु, मी पाकिस्तानी सरकारपर्यंत हा मुद्दा नक्की पोहचवेन, असे आश्वासन बासित यांनी दिले होते.

या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत गोपाळ बागले यांनी पाकचे सर्व दावे फेटाळून लावले. शहीद भारतीय जवानांच्या मृतदेहांवर रक्ताच्या नमुन्यांवरून हल्लेखोर हे पाकिस्तानमध्ये पळून गेल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे पाकिस्तानने हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या सैनिक आणि लष्करी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी बागले यांनी केली.

पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील पुँछ सेक्टरमधील कृष्णा घाटीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. पाकच्या या हल्ल्यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले होते. नायब सुभेदार परमजीत सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर हे या हल्ल्यात हुतात्मा झाले होते. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.