मणिपूरमधील जेडीयूचे पाच आमदार भाजपात दाखल झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सत्ताधारी भाजपाला २०२४ मधील निवडणुकीत संपवण्याच्या वक्तव्याची भाजपाने फलकांद्वारे खिल्ली उडवली आहे. भाजपाच्या या कृतीचा जेडीयूने खरपूस समाचार घेतला आहे. २०२४ मध्ये भारत ‘जुमलेबाज मुक्त’ होईल, असा पलटवार जेडीयूचे नेते राजीव रंजन ऊर्फ लालन सिंह यांनी केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव होईल, असेही रंजन यांनी म्हटले आहे.

मणिपूरमध्ये जेडीयूच्या आमदारांच्या भाजपा प्रवेशानंतर भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला होता. मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश ही राज्य ‘जेडीयू मुक्त’ झाली आहेत, असे मोदी म्हणाले होते. लवकरच लालू प्रसाद यादव बिहारलाही जेडीयू मुक्त करतील, असा निशाणाही मोदी यांनी नितीश कुमारांवर साधला होता. भाजपाच्या या शाब्दिक हल्ल्याला जेडीयू नेत्यांनी प्रत्युतर दिले आहे.

राजीव रंजन यांनी ट्विटरद्वारे भाजपाला लक्ष्य केले आहे. भाजपाने अरुणाचलमध्ये युती धर्म पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. मणिपूरमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर भाजपाचा पर्दाफाश झाल्याचे रंजन यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्तरावर जेडीयूचा वाढत चाललेला प्रभाव भाजपा थांबवू शकत नाही, असे ट्वीट देखील रंजन यांनी केले आहे. जेडीयूच्या आमदारांना फोडण्यासाठी भाजपा पैशांचा वापर करत असल्याचा आरोप जेडीयूचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नीरज कुमार यांनी केली आहे. “मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसणे हे भाजपाचे वैशिष्ट्य आहे. अरुणाचल प्रदेशातून आधी सात आमदारांनी आणि आता मणिपुरातील पाच आमदारांनी पक्षांतर केले आहे. या राज्यांमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक जिंकलो आहोत. लहान पक्षांना मोठे होऊ न देण्याचे भाजपाचे हे आणखी एक नवे वैशिष्ट्य आहे. देशातील जनता सर्व बघत आहे. येत्या २०२४ मध्ये जेडीयू भाजपाला संपवून टाकेल” असा संताप नीरज कुमार यांनी व्यक्त केला आहे.