केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच हिमाचल प्रदेश निवडणुकांसाठीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यापाठोपाठ गुजरात विधानसभा निवडणुकांच्याही घोषणा लवकरच केल्या जातील. पुढील महिन्यात या दोन राज्यांमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमवीर राष्ट्रीय पातळीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण आता रंगू लागलं आहे. निवडणुका जरी गुजरातमध्ये असल्या, तरी बिहारमध्येही त्याचे पडसाद उमटत असून सत्ताधारी जदयुचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी पाटण्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, त्यांच्यावर खोचक टोलाही लगावला.
“एखादा माणूस इतकी वर्षं पंतप्रधान राहिल्यावर..”
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून कधीही केलेल्या कामांचा हिशोब दिला नसल्याचं ललन सिंह म्हणाले. “एखादा माणूस इतकी वर्ष देशाचा पंतप्रधान राहिल्यानंतर देशाच्या जनतेला काही हिशोब देणार की नाही? पाच वर्षांत निवडणुका होतात. त्यावेळी मतं मागताना आपण पाच वर्षांत काय केलं, हे सांगावं लागतं की नाही? नरेंद्र मोदींनी लोकांसमोर जाऊन त्यांनी काय काय काम केलं, हे सांगताना कधी तुम्ही ऐकलं का? नाही”, असं ललन सिंह म्हणाले.
Global Hunger Index: भारताची परिस्थिती पाकिस्तान व नेपाळपेक्षाही वाईट; जागतिक भूक निर्देशांकात घसरण!
महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका
दरम्यान, देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात असल्याची टीका सिंह यांनी यावेळी केली. “देशात महागाई, बेरोजगारी वाढतेय. आहे ते रोजगारही संपवले जात आहेत. पण महागाईवर चर्चा होत नाही, विदेशातून आणलेल्या चित्त्यांवर चर्चा केली जाते. चित्ता काय नागरिकांची भूक भागवणार आहे का? केंद्र सरकारचं महागाईवर कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही”, असं ललन सिंह म्हणाले.
“खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे”
“हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. २०१४च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी देशभर फिरत म्हणत होते, ‘मी अतीमागास आहे’. पण गुजरातमध्ये अतीमागास वर्गच नाहीये. गुजरातमध्ये मागस वर्ग आहे. पण हे त्या मागास वर्गातही नव्हते. ते जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी स्वत:च्या समाजाला मागास वर्गात समाविष्ट करून घेतलं. हे तर डुप्लिकेट आहेत, हे ओरिजिनल कसे झाले?” असा खोचक सवालही ललन सिंह यांनी केला.