आपल्या विश्वाच्याही पलीकडे कोणतं विश्व आहे की नाही, याची उत्सुकता गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाला राहिली आहे. त्यासोबतच पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा मर्यादित साठा लक्षात घेता असाच साठा बाहेरच्या जगात कुठे आहे का याचाही शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. पण जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मानानं झळकणाऱ्या जेफ बेझोसनं मात्र मानवजातीच्या भवितव्याविषयी एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे. एखाद्या सायफाय चित्रपटात सापडावं, असं हे भाकित अस्तित्वात आलं, तर माणसाचं आयुष्य किती अमूलाग्र बदलून जाईल, याचीच कल्पना बेझोसच्या या भाकितानंतर केली जाऊ लागली आहे.

वॉशिंग्टनमध्ये झालेल्या ‘२०२१ इग्नॅशियस फोरम’मध्ये जेफ बेझोस सहभागी झाला होता. पृथ्वीवरचं जीवनमान वाचवण्यासाठी अंतराळाचा कसा उपयोग होऊ शकतो, याविषयीच्या चर्चेत त्यानं भाग घेतला होता. यावेळी पृथ्वीवरील मानवजातीचं भवितव्य काय असेल? या मुद्द्यावर बेझोसनं एक भन्नाट भाकित वर्तवलं आहे. जे सत्यात येण्याची पूर्ण शक्यता असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे!

अंतराळातील वस्त्या!

जेफ बेझोसनं भविष्यकाळात अंतराळात तरंगत्या मानवी वस्त्या असतील, असं भाकित वर्तवलं आहे “या तरंगत्या वस्त्यांवर पृथ्वीसारखंच वातावरण आणि गुरुत्वाकर्षणाचं बल असेल. या मानवी वस्त्यांमध्ये लाखो लोक राहू शकतील. या तरंगत्या जगात नद्या, जंगल आणि पशूसृष्टी देखील असेल”, असं जेफ बेझोसला वाटतं.

“अजून काही शतकांमध्ये अनेक लोकांचे जन्म हे अंतराळात होतील. तेच त्यांचं पहिलं घर असेल. त्या वस्त्यांमध्येच त्यांचा जन्म होईल. तिथेच ते राहतील आणि आपण एखाद्या बगीच्याला भेट देण्यासाठी किंवा सहलीला जातो, तसे ते पृथ्वीवर येतील”, असं बेझोस म्हणाला आहे.

कॉलेजमध्ये असतानाच मांडली होती कल्पना!

खरंतर बेझोसनं अशा प्रकारच्या अंतराळातील तरंगत्या मानवी वस्त्यांची कल्पना पार तो कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्या एका भाषणात मांडली होती. बुधवारी यावर बोलताना बेझोस म्हणाला, “अंतराळातील तरंगत्या वस्त्या हा इतर ग्रहावर मानवी जीवन पुन्हा सुरू करण्यापेक्षा जास्त चांगला पर्याय आहे”!