सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) बुधवारी रात्री उशिरा जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला. एका ट्रॅव्हल कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. संबंधिक कंपनीनं गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांच्यावर ४६ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याव्यतिरिक्त परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत त्यांचा जबाबही नोंदवला आहे.

यापूर्वी गोयल यांच्या मुंबई आणि दिल्लीमधील एकूण १२ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होते. परकीय चलन विनिमय कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांतर्गत हे छापे टाकण्यात आले होते. २०१४ मध्ये कऱण्यात आलेल्या या गुंतणुकीदरम्यान एफडीआयच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलं होतं.

तसंच गोयल यांच्या परदेश दौऱ्यांवरही बंदी घालण्यात आली होती. परंतु त्यांनंतर न्यायालयानं त्यांना परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. १९९२ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या बोर्डावरुन नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिला होता. नरेश गोयल चेअरमन पदावरुनही पायउतार झाले होते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार असल्याचे आढळले होते. १७ एप्रिल रोजी जेट एअरवेज पूर्णपणे ठप्प पडली.