पीटीआय, मेहसाणा : परवानगीशिवाय ‘आझादी मार्च’ काढल्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणात येथील दंडाधिकारी न्यायालयाने गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह इतर नऊ जणांना गुरुवारी दोषी ठरवून तीन महिने कैदेची शिक्षा सुनावली.

 अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. ए. परमार यांनी मेवानी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पटेल आणि मेवानी यांच्या राष्ट्रीय दलित अधिकार मंचाच्या काही सदस्यांसह इतर नऊ जणांना बेकायदेशीर जमावाचा भाग असल्याबद्दल भादंविच्या कलम १४३ अन्वये दोषी ठरवले. न्यायालयाने सर्व १० दोषींना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. जुलै २०१७ मध्ये परवानगी न घेता मेहसाणा येथून बनासकांठा जिल्ह्यातील धानेरापर्यंत ‘आझादी मार्च’ काढल्याबद्दल मेहसाणा पोलिसांनी मेवानी व इतरांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. एफआयआरमधील एकूण १२ आरोपींपैकी एक जण मरण पावला, तर एक अद्यापही फरार आहे.