जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये शुक्रवारी भारतीय सैन्याकडून पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमच्या (बॅट) दोन सैनिकांना कंठस्नान घातले. भारतीय लष्कराचे गस्ती पथक नियंत्रण रेषेनजीक गस्त घालत असताना त्यांना या भागातील पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा (बॅट) वावर लक्षात आला. त्यानंतर भारतीय जवानांनी लगेचच कारवाई करत त्यांना प्रत्युत्तर दिले. अजूनही या ठिकाणी लष्कराची शोधमोहिम सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून भारत-पाक सीमेवरील तणाव प्रचंड वाढला आहे. काही दिवसांपूर्वी पुंछ सेक्टरमधील कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानच्या बॅट टीमने घुसखोरी करत दोन भारतीय जवानांची हत्या केली होती. यावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबनाही केली होती. पाकिस्तानकडून बॉर्ड अॅक्शन टीमचा वापर नियंत्रण रेषेजवळ छापे टाकण्यासाठी केला जातो. पाकिस्तानी सैन्याचा स्पेशल सर्विस ग्रुप बॅटचा प्रमुख हिस्सा आहे. लपूनछपून छापे टाकणे आणि कोणत्याही मार्गांचा अवलंब करुन भारतीय सैन्याच्या वरचढ कारवाया करणे, ही जबाबदारी बॅटकडे असते. बॅटमध्ये पाकिस्तानी सैन्याबरोबरच दहशतवाद्यांचाही समावेश असतो.

काही दिवसांपूर्वीच भारताने दहशतवादास मदत करणाऱ्या पाकिस्तानी हद्दीतील चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ जारी केला होता. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. त्यानंतर पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या धमक्या द्यायला सुरूवात केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jk attack by pakistan border action team on indian army patrol along the loc in uri sector foiled 2 bat attackers killed
First published on: 26-05-2017 at 15:44 IST