JNU Vice-Chancellor on chhatrapati shivaji maharaj : राज्यात गेल्या काही दिवासांपासून भाषेचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने प्राथमिक शाळांमध्ये हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर त्याल विविध स्थरांतून विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. मात्र यानंतरही देशभरात भाषेच्या मुद्द्यावर चर्चा होताना दिसत आहे. यादरम्यान दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाषेच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी देशाच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणांची गरज यावर देखील महत्त्वाचे भाष्य केले आहे.

मराठी भाषेबद्दल बोलताना शांतिश्री धुलीपुडी पंडित म्हणाल्या की, “मी प्रथम मातृभाषेला प्राधान्य देईन कारण मातृभाषा ही सर्वात महत्त्वाची आहे. इतर दोन भाषा तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या गरजेनुसार असायला हव्यात. तुम्ही कुठेही राहा, स्थानिक भाषा आणि तुमच्या नोकरी किंवा व्यवसायाची भाषा शिका. पण, हा नागरिकांचा वैयक्तिक निर्णय असायला पाहिजे.”

इतिहास समजून घेणे महत्त्वाचे

पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “मराठीमध्येही इतर भाषांप्रमाणेच संकल्पना आहेत. त्यामध्ये वेगळेपणा आहे. कारण मुघलांना विरोध करणारे शेवटचे साम्राज्य मराठा साम्राज्य होते. त्यामुळे इतिहासाचा हा भाग समजून घेणे, याबरोबरच त्याचे भविष्यातील परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. जसे की चीनने ‘संग त्सू’ वर आधारित धोरणे तयार केली, इथे आपल्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ते करायचे आहे, जे की आजवरचे सर्वात थोर व्यक्तिमत्व आणि नायक होते. यामुळे संयुक्त आणि सशक्त भारतासाठी पंतप्रधानांचे ‘विकसीत भारत’चे स्वप्न आणि ध्येय देखील साकार होईल.”

“आपल्याला माहिती आहे की, शिवाजी महाराजांचे गनिमी युद्धाबाबतचे डावपेच हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण आपले शेजारी आपल्या विरोधात एकत्र आले आहेत. आणि म्हणून आपली हल्ला करण्याची कितीही चांगली असली तरी ते महत्त्वाचे आहे, विशेषतः आत्मनिर्भर भारत. शिवाजी महाराजांचा देखील भारतीय लोकांना एकत्र आणून त्यांना आपल्याकडे कौशल्य आणि क्षमता आहेत हे दाखवून देण्यावर विश्वास होता. कान्होजी आंग्रे हे नौदलाचे प्रमुख होते. त्यामुळे आपण त्यांनी एखादी नसलेली गोष्ट दाखवण्याचे कौशल्य कसे वापरले हे आपण त्यांच्या समुद्री किल्ल्यांच्या बांधकामातून पाहू शकतो. भरतीच्या काळात ते पाण्याखाली जात आणि ओहटीच्या काळातते वर येत,” असेही शांतिश्री धुलीपुडी पंडित म्हणाल्या.