एपी, जेरुसलेम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांना इस्रायलच्या न्यायालयीन व्यवस्थेत बदलांचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु नेतान्याहू यांनी तो मान्य करण्यास नकार देत आपला देश स्वत:चे निर्णय घेतो, असे स्पष्ट केले. अमेरिका व इस्रायल या दोन मित्रदेशांच्या सर्वोच्च नेत्यांनी अशा प्रकारे सार्वजनिकपणे मतभेद व्यक्त करण्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. यावरून नेतन्याहू यांच्या न्यायालयीन बदलांच्या प्रस्तावावर इस्रायल आणि अमेरिकेत मतभेद निर्माण झाल्याचे दिसत आहे.
नेतन्याहू यांच्या ‘न्यायिक सुधारणा योजने’ला इस्रायलमध्ये अभूतपूर्व विरोध झाला. तीव्र आंदोलनामुळे देशात दुफळी पडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यानंतर नेतान्याहू यांनी ही योजना स्थगित केली. पत्रकारांनी मंगळवारी बायडेन यांना इस्रायलच्या या न्यायालयीन बदलांबाबत प्रतिक्रिया विचारली. बायडेन यांनी सांगितले, की नेतान्याहू यांनी हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी अपेक्षा आहे. बायडेन यांनी स्पष्ट केले, की नेतन्याहू यांचे सरकार अशा प्रकारे वाटचाल करू शकत नाही. त्यांनी याबाबत नेतान्याहू यांना तडजोड करण्याचे आवाहन केले. नेतन्याहू यांना लवकरच ‘व्हाईट हाऊस’मध्ये आमंत्रित करावे, असे अमेरिकेचे राजदूत थॉमस नाइड्स सुचवले होते. ही सूचना नाकारताना बायडेन यांनी स्पष्ट केले, की नजीकच्या भविष्यकाळात तरी त्यांना बोलावले जाणार नाही.
बायडेन यांच्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तरादाखल नेतान्याहू म्हणाले, की इस्रायल हा सार्वभौम देश आहे आणि तो आपल्या नागरिकांच्या इच्छेनुसार निर्णय घेतो. आम्ही जरी चांगले मित्र असलो तरी इतर देशांच्या दबावाखाली नाही. नंतर बुधवारी मात्र नेतान्याहू यांनी आपला सबुरीच्या स्वरात स्पष्ट केले, की इस्रायल आणि अमेरिकेत अधूनमधून प्रासंगिक मतभेद होत असतात. मात्र उभय राष्ट्रांची युती अभेद्य व भक्कम आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. परराष्ट्र विभागाच्या ‘समिट फॉर डेमोक्रसी’मध्ये ते बोलत होते. नेतन्याहू आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या आघाडीने त्यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी जानेवारीत न्यायालयीन बदलांची घोषणा केली. त्यामुळे इस्रायलला दशकातील सर्वात देशांतर्गत संघर्षांस तोंड द्यावे लागले.
बायडेन यांचे समर्थन व टीका
बायडेन यांच्या प्रतिक्रियेनंतर एकीकडे इस्रायलमधील न्यायिक बदलांना विरोध करणाऱ्या आंदोलकांनी गुरुवारी तेल अवीवमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर बायडेन यांच्या समर्थनार्थ निदर्शने आयोजित केली. तर दुसरीकडे नेतान्याहूं यांच्या मित्रपक्षांनी अमेरिकेवर टीकेची झोड उठवली. नेतन्याहूचे निकटचे सहयोगी आणि गृहमंत्री इटामार बेनग्वीर यांनी इस्रायलच्या ‘आर्मी रेडिओ’ला सांगितले, की इस्रायल अमेरिकेच्या राष्ट्रध्वजातील आणखी एक तारा नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांनी इस्रायलमधील हा मुद्दा समजून घ्यावा, अशी मला अपेक्षा आहे.