पीटीआय, लखनौ

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यांच्या न्यायिक आयोगाची स्थापना केली आहे. हा आयोग आज, शुक्रवारी घटनास्थळी भेट देईल. या घटनेच्या चौकशीसाठी आयोगाला महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हर्ष कुमार या आयोगाचे प्रमुख आहेत. त्यांच्याखेरीज माजी पोलीस महासंचालक व्ही. के. गुप्ता आणि निवृत्त आयएएस अधिकारी डी. के. सिंह यांचा या पॅनेलमध्ये समावेश आहे. आयोगाने गुरुवारी कामाला सुरुवात केली. ‘आयोगाकडे चौकशी पूर्ण करण्यासाठी महिनाभराचा वेळ आहे. मात्र, चौकशी अधिक जलद करू,’ अशी प्रतिक्रिया कुमार यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

भाविकांच्या सुरक्षेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमबजावणी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली.

कुंभमेळ्यात पुन्हा आग, १५ तंबू भस्मसात

चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच गुरुवारी चमनगंज चौकीजवळ लागलेल्या आगीत किमान १५ तंबू भस्मसात झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्दीच्या व्यवस्थापनाची चोख तयारी

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक कसून तयारी केली आहे. येत्या वसंत पंचमीला अमृत स्नान होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असल्याचे महाकुंभमेळ्यासाठी नियुक्त पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितले.