बुरखाधारी मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश न दिल्याने संताप
हिजाब वादामुळे आठवडाभर बंद राहिलेली कर्नाटकमधील अनेक कनिष्ठ महाविद्यालये बुधवारी पुन्हा सुरू झाल्यानंतर, बुरखाधारी मुस्लीम विद्यार्थिनींना आत प्रवेश न देण्यात आल्यामुळे तेथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अनेक संवेदनशील ठिकाणच्या कनिष्ठ महाविद्यालयांत व त्यांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लीम विद्यार्थिनींच्या एका गटाने बुरखा किंवा हिजाब न काढण्याचा हट्ट कायम ठेवला.
उडुपी जिल्ह्यात कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालये बुधवारी पुन्हा सुरू झाली. महाविद्यालयांच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून पोलीस तेथे चोख दक्षता बाळगत आहेत.
हिजाबवरील बंदीच्या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या ६ मुस्लीम विद्यार्थिनी गैरहजर होत्या, असे उडुपीच्या शासकीय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रुद्रे गौडा यांनी सांगितले. इतर मुस्लीम विद्यार्थिनींनी वर्गात जाण्यापूर्वी हिजाब काढून ठेवल्याने महाविद्यालायीतल वर्ग सुरळीत सुरू होते.
‘हिजाब घालण्याबाबत संस्थेत विशिष्ट नियम नव्हते व गेली ३५ वर्षे कुणीही वर्गात हिजाब घालत नव्हते. आता ज्या विद्यार्थिनी हिजाब घालू देण्याची मागणी करत आहेत, त्यांना बाह्य शक्तींचा पाठिंबा आहे’, असे प्राचार्य रुद्रे गौडा म्हणाले.
याच जिल्ह्याच्या कुंदापूर येथील शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील ज्या २३ मुस्लीम विद्याथिर्नीनी हिजाब घालण्याचा आग्रह कायम ठेवला होता, त्याही बुधवारी महाविद्यालयात आल्या नाहीत. गेल्या आठवडय़ात त्यांनी वर्गात जाण्यापूर्वी हिजाब काढण्यास नकार दिल्यामुळे त्यांना वेगळय़ा वर्गात बसवण्यात आले होते.
उडुपीतील मणिपाल येथील एमजीएम महाविद्यालायतील वर्ग बुधवारी सुरू झाले नाही. गेल्या आठवडय़ात विद्यार्थ्यांच्या गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे येथे अनागोंदी माजली होती. अधिकाऱ्यांनी बुधवारी महाविद्यालयाला सुटी जाहीर केली होती.
अज्जारकाड येथील जी. शंकर महिला महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब काढून वगार्त जाण्याची परवानगी देण्यात आली. ज्यांनी यास नकार दिला, त्यांची वेगळय़ा वर्गात व्यवस्था करण्यात आली.
हिजाब वादाशी संबंधित सर्व याचिका प्रलंबित असताना, विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धार्मिक पेहराव करून वर्गात बसण्यास कर्नाटक उच्च न्यायालयने अंतरिम आदेशाद्वारे मनाई केली होती.
राज्यातील पदवी महाविद्यालयेही बुधवारी सुरू झाली, मात्र तेथे कुठल्याही प्रकारच्या गणवेषाची सक्ती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचा वेश करण्याची मुभा असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.
विजयपुरा येथे मुलींनी बुरखा काढण्यास नकार दिल्यामुळे त्यांना महाविद्यालय परिसरात जाऊ देण्यात आले नाही. बिजापूर, कलबुर्गी व यादगीर येथेही अशाच घटना घडल्या.
बुरखा घालून आलेल्या मंगळूरु शहरातील दोन महाविद्यालयांतील २८ विद्यार्थिनींना बुधवारी घरी पाठवण्यात आले. इतर दोन महाविद्यालयांत हिजाब काढल्यानंतर विद्यार्थिनींना वर्गत बसण्याची परवानगी देण्यात आली.
शिवमोगात महाविद्यालयांना सुटी
शिवमोगातील सागर शासकीय कनिष्ठ महावद्यालयात तणाव वाढल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने बुधवारी सुटी जाहीर केली. शिवमोगातील डीव्हीएस महाविद्यालयात महाविद्यालयाबाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींनी आपला धर्म कुठल्याही सरकारी आदेशापेक्षा महत्त्वाचा असल्याचे पत्रकारांना सांगितले. ‘धर्माचे पालन आमच्यासाठी शिक्षणाइतकेच महत्त्वाचे असून, बुरखा हा आमच्या धर्माचा भाग आहे. आम्ही तो काढणार नाही’, असे त्या म्हणाल्या.