वृत्तसंस्था, चंडीगड
पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी आपले संबंध असल्याचे यूट्यूब ब्लॉगर ज्योती मल्होत्राने कबूल केले आहे. हरियाणा पोलिसांनी ज्योतीला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केली असून तिच्याविरोधात अधिकृत गुपिते कायदा आणि भारतीय न्याय संहितअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्योतीसह हरियाणा, पंजाब व उत्तर प्रदेशातून हेरगिरीच्या आरोपावरून १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ज्योती अजिबात विचलित झाली नसल्याचे समजते. उलट, आपल्याला कोणताही खेद वाटत नसल्याचे तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. ‘‘आपण काही चूक केली आहे असे तिला वाटतच नाही. आपण जे केले ते योग्यच होते असे तिला वाटते,’’ असे या अधिकाऱ्याने सांगितले.
उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांकडून ज्योतीची चौकशी केली जात आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणारा आणि नंतर हकालपट्टी करण्यात आलेला कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्या आपण थेट संपर्कात होतो असे तिने या चौकशीत कबूल केले. हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती नोव्हेंबर २०२३मध्ये दानिशच्या संपर्कात आली. तेव्हापासून ती मार्च २०२५पर्यंत त्याच्याशी सातत्याने संपर्कात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दानिश हा मल्होत्राला हेरगिरीच्या कामासाठी महत्त्वाची व्यक्ती म्हणून घडवण्यात सक्रिय होता. पोलिसांनी तिचे तीन मोबाईल फोन आणि लॅपटॉपही जप्त केला आहे. तसेच हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचा आयटी प्रभारी हरकिरत सिंग याचेही दोन फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या उपकरणांची न्यायवैद्याक तपासणी केली जात आहे.
पहलगाम भेटीचा तपास
ज्योती तीन महिन्यांपूर्वी पहलगामला जाऊन आली होती, त्याचाही तपास केला जात आहे. त्या काळात तिने काही हेरगिरीच्या कारवाया केल्या का किंवा काही डेटा संकलित केला अथवा इतरांना दिला का याबद्दल आम्ही तपास करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी
नवी दिल्ली : दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये काम करणाऱ्या आणखी एका पाकिस्तानी अधिकाऱ्याची बुधवारी हकालपट्टी करण्यात आली. अलिकडे अशा प्रकारची ही दुसरी कारवाई असल्याचे संबंधितांनी सांगितले. या प्रकरणी उच्चायुक्तालयाचे प्रभारी अधिकारी साद वराइच यांच्याकडे या प्रकरणी औपचारिक निषेध नोंदवण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. हकालपट्टी करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला २४ तासांमध्ये देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे.